
रत्नागिरी- समाजातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने तसेच महिलांच्या अडीअडचणींची शासकीय यंत्रणांकडून तात्काळ सोडवणूक व्हावी व पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. याच अनुषंगाने शासनातर्फे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर” कार्यक्रमाचे आयोजन दि. 2 मे ते 31 मे 2023 या कालावधीत करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हयामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणेला सहभागी करून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकास्तरावर तहसिलदार व बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व तालुकास्तरीय शासकीय कार्यालयप्रमुखांच्या सहभागातून राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या महिलांच्या तक्रारींचा संबंधित विभागाच्या समन्वयाने तात्काळ निपटारा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मात्र संबंधित तक्रारीवर योग्य तो निपटारा कार्यक्रमाच्या ठिकाणी होवू न शकल्यास संबंधित यंत्रणेने विहित मुदतीमध्ये तक्रारींचा निपटारा करण्याबाबत शासनाने सूचित केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध शासकीय यंत्रणा महिलांसाठी असलेल्या विविध योजनांचे माहितीपर स्टॉल उभे करणार असून यावेळी महिलांसाठीच्या योजनांच्या माहिती पुस्तकांचेही वाटप केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील महिलांनी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर” या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.