
मुंबई- विधीमंडळाचं सर्वोच्च सभागृह म्हणजे विधानपरिषद. या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ आज बुधवारी संपला. अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने आता विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर आता कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या विरोधी पक्षातल्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्याचा विरोधी पक्षनेता होतो. दानवे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे या पदावर काँग्रेसचा दावा असणार आहे. त्यात शिवसेना ठाकरे गट आपला दावा सोडणार का? हेही पहावं लागणार आहे. त्यामुळे विधान परिषदेत पुढचा विरोधी पक्षनेता कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेत काँग्रेस पक्षाचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे सहाजिकच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे. मात्र काँग्रेस पक्षात हे पद कोणाला मिळते याबाबत एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावाची या पदासाठी चर्चा आहे. सतेज पाटील हे काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आहेत. विधान परिषदेत काँग्रेस पक्षाची बाजू ते मांडतात. त्यासोबतच त्यांचा अभ्यास देखील प्रत्येक विषयात दिसून येतो. दुसरं नाव म्हणजे राजेश राठोड. राजेश राठोड देखील प्रत्येक विषय विधान परिषदेत विरोधकांची बाजू ठामपणे मांडतात. त्यामुळे राजेश राठोड यांच्या देखील नावाची चर्चा आहे.

संख्याबळ पाहिलं तर सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत. अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपायच्या आधी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार हे प्रत्येकी सात होते. मात्र खालच्या सभागृहात म्हणजेच विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विरोधी पक्षनेते पद हवं होतं. त्यामुळे वरचं म्हणजेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसने आपल्याकडे मागितलं. त्यामुळे सहाजिक संख्या बळ आता काँग्रेसचे जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच होईल हे निश्चित आहे. मात्र तो कोण यावर अजूनही शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
