
संगमेश्वर : १२६ गावांसाठी केवळ ६२ ग्रामसेवकसंगमेश्वर तालुका ; ११ ग्रामसेवक जिल्हा बदलीच्या प्रतिक्षेतसाडवली, ता. २२ ः देवरूख पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांची कमतरता असल्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसत आहे. सध्या तालुक्यात एकूण १२६ ग्रामपंचायती असून केवळ ६२ ग्रामसेवक कार्यरत आहेत. यामध्ये ११ ग्रामसेवक हे जिल्हा बदलीने जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे एका ग्रामसेवकावर दोन किंवा तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार सांभाळवा लागत आहे. संगमेश्वर तालुक्याची भौगोलिक रचना लक्षात घेता काही गावांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी सुमारे ५० किमी अंतर पार करून यावे लागते. एका बाजूला चिपळूणच्या सीमेवर असलेले गाव शिरंबे तर दुसरे टोक रत्नागिरी तालुक्याच्या लगत असलेले पोचरी देणं ही दुर्गम गावे यामुळे या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी कामकाज कसे करावे हा मोठा प्रश्न आहे. पूर्वी तालुक्यात १०४ ग्रामसेवक कार्यरत होते. सध्या केवळ ६२ कर्मचारी आहेत. यातील ११ ग्रामसेवक जिल्हाबदलीने जाण्याच्या तयारीत आहेत

त्यामुळे अपुऱ्या ग्रामसेवक कर्मचाऱ्यांमुळे तालुक्याच्या विकासकामांवर विपरित परिणाम होत आहे. एक कर्मचारी दोन-तीन गावांचा गाडा रेटवत आहेत. अपुरे कर्मचारी असूनसुद्धा तालुक्याचे गटविकास अधिकारी भरत चौगुले हे आपल्या कार्यशैलीने तालुक्याचे कामकाज जिल्ह्यात अव्वल ठेवण्याची किमया साधत आहेत. असे असले तरी अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. तरी तालुक्यात ग्रामसेवकांची तातडीने पदभरती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.