इंडिया आघाडीनं मुंबईतील सभेत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला. भाजपा ही भ्रष्टाचाराच्या पायावर उभारलेली आहे. विरोधकांपासून वाचण्यासाठी आणि सत्तेवर नियंत्रण मिळण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय तपास संस्थांची मदत घेतली जात असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.
मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इलेक्टोरॉल बाँडवरून भाजपावर जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, भाजपाकडून केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर होत आहे. तपास संस्थांच्या मदतीनं विरोधी पक्षांना लक्ष्य केलं जात आहे. विरोधी पक्ष सत्तेत येणार आहेत. त्यानंतर तुम्ही स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करा. लोखंड हे लोखंडाला कापते, असा थेट इशाराच खासदार राऊत यांनी दिला.
खासदार संजय राऊत म्हणाले, “काही आठवड्यांपूर्वी ऑनलाईन गेमिंग कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. जुगारामुळे लोकांचे विशेषत: तरुणांचे आणि समाजाचे भविष्य अंधकारात ढकललं जात आहे. मुंबईसह इतर भागातील डान्सबार विरोधात भावना होती. तेव्हा राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी धाडस दाखवून डान्सबारवर बंदी आणली होती. त्याचप्रमाणं या सरकारनं ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराबाबत कारवाई करायला हवी, अशी मागणी ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते राऊत यांनी केली.
पैसे इलेक्टोरल बाँडमधून भाजपाला पाठविला का?..
पोलिसांवर खूप दबाव आहे. वरपर्यंत पैसा दिला जातो. हा पैसा कोणाकडं आणि कोणत्या हेतुसाठी दिला जातो, हेदेखील मला माहित आहे, असा गंभीर खासदार राऊत यांनी यावेळी केला. ड्रग माफियांवर सरकारकडून कारवाई का होत नाही? त्यांचा पैसे इलेक्टोरल बाँडमधून भाजपाला पाठविला का? त्यामुळे ते इलेक्टोरल बाँडची माहिती देण्यास टाळतात का? असा आरोप खासदार राऊत यांनी केला.
स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा-
पुढे संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी हे देशातील लोकप्रिय नेते आहेत. देशात भावी पंतप्रधान म्हणून लोक त्यांना पाहत आहेत. ते परखडपणे भूमिका मांडत असून झुकत नाहीत. त्यांचा बाणा या देशातील लोकांना आवडतोय. ते हुकूमशाही पुढे न झुकणारे आहेत. जे शरण गेले आहेत, त्यांना इतिहास माफ करणार नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. भाजपा हा दुसऱ्यांचे पोरं पळून मोठा झालेला पक्ष आहे. सर्व फोडलेली पोर घेऊन बसले आहेत. स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा. दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालू नका. ते पुन्हा पळून जातील,” असा शब्दांत खासदार राऊत यांनी राजकीय पक्षांच्या फोडाफोडीवरून भाजपाची खिल्ली उडविली.
पंतप्रधान मोदी हे तामझाम घेऊन फिरत आहेत. हे उल्लंघन नाही का? कुठे गेला निवडणूक आयोग-खासदार संजय राऊत
कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना देण्यात येणार…
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत माहिती दिली. ठाकरे गटाचे नेते राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीतील जागावाटप संपलेलं आहे. रामटेकची जागा ही काँग्रेसला निश्चित झालेली आहे. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे ( ठाकरे गट) राहिल. कोल्हापूर ही आमची सेटिंग जागा आहे. चंद्रहार पाटील यांना सांगलीसाठी उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. दोन दिवसात सांगलीमध्ये उद्धव ठाकरे जात आहेत. काँग्रेसच्या माध्यमातून कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना द्यायची ठरलं आहे. आम्ही दौरा झाल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहोत. हातकणंगलेच्या जागेबाबत राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर काँग्रेस चर्चा करत आहे. प्रकाश आंबेडकर हे रविवारी सभेला आले होते. ही सकारात्मक गोष्ट आहे.”