रत्नागिरी : कोकणात एकीकडे रिफायनरीवरून वाद सुरू असताना दुसरीकडे कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर तेलाचे साठे आहेत का? याची चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण आहे खोल समुद्रात या ओएनजीसीच्या जहाजाकडून तेलाच्या साठ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
जयगड ते रायगड समुद्र कीनाऱ्यापासून ४० नॉटिकल मैल आत समुद्रामध्ये ONGC कंपनीमार्फत तेलाचे साठे शोण्यासाठी सिझमिक सर्व्हे करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या जहाजांद्वारे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत हा सर्व्हे केला जाणार आहे. हा सर्व्हे सुरू असताना कुठलीही दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. मासेमारी करण्यासाठी जाताना सुरक्षितता बाळगावी किंवा जहाजाच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन मत्स्य विभागाकडून मच्छिमारांना करण्यात आले आहे
याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सोसायटींना पाठविण्यात आले आहे. हा सर्व्हे समुद्रात ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणाचा नकाशा अक्षांश व रेखांशची माहिती मच्छिमारांना कळविण्यात आली आहे. ओएनजीसी कंपनीमार्फत समुद्रात फेब्रुवारी २०२३ अखेरपर्यंत तेल संशोधन करण्यात येत आहे.
सर्व्हेसाठी भूकंप संशोधन जहाज जयगड ते रायगडपासून ४० नॉटीकल मैल परिसरात दाखल झाले आहे. हे सर्वेक्षण किनाऱ्यापासून लांब दाभोळपासून खोल समुद्रात ७५ कि. मी. अंतरावर होणार आहे. जहाजावरील विविध यंत्रणांच्या माध्यमातून पाण्याखालील माहिती संकलित केली जाणार आहे. हे जहाज ४ ते ४.५ नॉट्स वेगाने २४ तास सतत समुद्रात चालवले जाणार आहे. या जहाजाच्या मागे ६००० मीटर लांबीच्या (६ कि.मी) दहा केबल लावण्यात आल्या आहेत.
स्ट्रीमर्सची खोली ६ मीटर शेपटीच्या दिशेने ३० मीटरपर्यंत पाण्याखाली असणार आहे. प्रत्येक सहा हजार मीटर केबलच्या लांबीच्या शेवटी फ्लशिंग लाइटसह एक टेल-बॉय असेल. ही बोट सतत चालवण्यात येणार असून ती लागलीच वळवता येत नाही. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी मच्छिमारांनी नौका व जाळी भूकंपीय जहाज आणि बाहेरील उपकरणाच्या मार्गापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन मत्स्य विभागाकडून करण्यात आले आहे.
आता या सर्व्हेनंतर कोकणातील रायगड ते जयगड हद्दीतील खोल समुद्रात तेलाचे साठे मिळतात का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. असे तेलाचे साठे या किनाऱ्यावरती खोल समुद्रात मिळाल्यास भविष्यात कच्चा तेलाचा प्रकल्प उभारणीसाठी हालचाली केल्या जाऊ शकतात.