
ठाणे : मुंब्रा-शिळ परिसरातील खान कंपाऊंड भागात उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सलग दुसऱ्या दिवशीही तोडक कारवाई सुरू ठेवली आहे. शुक्रवारी पाच इमारतींवर कारवाई केल्यानंतर शनिवारी आणखी आठ इमारतींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आलेल्या या इमारती ४ ते थेट ९ मजल्यांपर्यंत उभ्या राहिल्याचे समोर आले असून, त्या कोणाच्या आशीर्वादाने उभारल्या गेल्या, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत मुंब्रा शिळ भागातील गट क्रमांक १७८, १७९ आणि १८०, शिळ येथील १७ अनाधिकृत इमारतींच्या एका प्रकरणावर सुनावणी झाली. त्यानुसार, या भागातील इमारतींवर कारवाई करण्यास शुक्रवार पासून सुरवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात पाच इमारतींवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर, शनिवारी देखील या भागात शिल्लक राहिलेल्या इमारतींवर कारवाई करण्यात आली.