लांजा : चूल आणि मूल या जुन्या पारंपारिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन सामाजिक, शैक्षणिक, सहकार, क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा लांजा येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्थेच्या वतीने महिला दिनी बुधवारी ८ मार्च रोजी सन्मान करण्यात आला.महिला दिनाचे औचित्य साधून कुणबी विकास सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये हा महिला सन्मान कार्यक्रम पार पडला.
महिला म्हटलं की चूल आणि मूल या पलीकडे त्यांचे कार्यक्षेत्र नाही. मात्र या साऱ्या समजुतीला फाटा देत आज अनेक महिला या उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या यशस्वीपणे सांभाळून घर संसार देखील तितक्याच ताकतीने पेलत आहेत. आणि म्हणूनच लांजा शहर व तालुक्यातील अशा गौरवशाली महिलांचा महिलादिनी सन्मान करण्याचा कार्यक्रम कुणबी विकास सहकारी पतसंस्थेने हाती घेतला होता.
या कार्यक्रमात प्रभानवल्ली शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ.प्रिया जयराज मांडवकर, वकील सौ. स्मिता हरिश्चंद्र मांडवकर ,ग्रामसेविका सौ. उज्वला प्रकाश मांडवकर, लांजातील ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षिका सौ. छाया मंदार गांगण आणि येथील दत्त भेळच्या माध्यमातून उद्योग व्यवसायात पाय ठेवणाऱ्या सौ. वैदेही धनंजय वणजू, तसेच सौ. प्रभावती बळीराम जाधव या महिलांचा संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विलास दरडे, संचालक श्री. शांताराम गाडे, श्री.आत्माराम धुमक, श्री.चंद्रकांत धनावडे, श्री. नंदकुमार आंबेकर, श्री. गणेश जोशी, श्री.बाळकृष्ण जोशी, श्री. वसंत बंडबे, तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे, आणि कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.