कोकणात पर्यटन वाढत असताना आपल्याला निसर्गाची काळजी घेऊन स्वच्छता, जल संवर्धन व व्यवस्थापन, वने संवर्धन व व्यवस्थापन करणे आवश्यक असून आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारे सडे, जंगले यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन निसर्ग वाचावावा. जंगलातील वणवा हा नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित असतो. काही वेळा चुकून, काही वेळा जाणून बुजून अथवा काही वेळा साफसफाईच्या नावाखाली आगी लावल्या जातात. यामुळे जंगल, सडे नष्ट होऊन संपूर्ण जैवविविधता संपते याचा दूरगामी परिमाण असेच सुरू राहिल्यास नकारात्मक होऊ शकतो.
गावागावात बारमाही वाहणारे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असून येथे सुद्धा माझ्या मोठ्या कचरा टाकला जातो. पर्या, ओढे, नद्या, तळी, खारलॅण्ड यामध्ये प्लास्टिक, काचा, थर्माकोल आणि बाकी विघटन न पावणारे साहित्य असते ग्रामस्थांमध्ये जाणून बुजून, अथवा निसर्गाबाबत अनास्था व जनजागृती नसल्याने असे प्रकार घडत आहेत. आपणच आपला गाव दूषित, अस्वच्छ करीत आहोत हेच ध्यानात येत नाही आहे. त्यासोबत येथील पाण्याचे स्त्रोत दूषित होऊन नंतर पाणीटंचाई जाणवते.
कोकणात कोल्हापुरी प्रकाराचे बंधारे न बांधता गावागावातील भौगोलिक परिस्थिती बघून येथील बंधारे बांधण्यात यावेत व जास्तीत जास्त जल संचय होऊन, जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरेल
वन संवर्धन करून ग्रामीण भागात आढळणार्या दुर्मिळ वनस्पती व रानातील वृक्ष यांचे संवर्धन होणे जरुरी आहे. गावातील जाणार्या रस्त्यांवर दुतर्फा जंगली झाडे लावणे महत्त्वाचे आहे. तसेच प्रत्येक गावात राखीव जंगले होणे जरुरी असून येथे जंगली झाडासोबत विविध फळझाडे सुद्धा लावायला पाहिजेत जेणेकरून माकडे यांचा त्रास भविष्यात कमी होईल.
कोकणातील अनेक गावे ही समुद्र व खाडीकिनारी बसलेली आहेत. या अनेक गावांमध्ये खारलॅण्ड मळे आहेत. येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. यावर सुद्धा नियोजन आवश्यक आहे. अनेक भागात पर्यटक येत असतात पण येथे खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाकण्यात येते यामुळे या भागाचे विद्रूपकरण होते. याचा नकारात्मक परिणाम पर्यटनावर होतो.
यानुसार विविध नाविन्यपूर्ण निर्णय ग्रामसभेत युवकांनी, ज्येष्ठ मंडळीनी घ्यावा. वर्षातून दोन तरी ग्रामसभा या स्वच्छता नियोजन, जल संवर्धन, निसर्ग, वन संवर्धन, जैवविविधता संरक्षण यावर घेण्यात याव्यात असे आवाहन ॲड. ज्ञानेश पोतकर यांनी केले. ॲड पोतकर यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले.