
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण व गुहागर तालुक्यातील डोंगररांगा दरवर्षी लागणाऱ्या वनव्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानीला आळा घालण्यासाठी ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात शेतकऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वनवा मुक्तीच्या दिशेने उल्लेखनीय कार्य करणारे नंदुरबारचे फॉरेस्ट ऑफिसर संजय साळुंखे या मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, प्राजक्ता टकले, सुयोग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी चिपळूण व गुहागर तालुक्याच्या डोंगराळ भागांमध्ये लागणाऱ्या वनव्यांमुळे जंगल, जैवविविधता व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात यासाठी “Wildfire Watcher Camps” उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये वनव्याप्रवण डोंगरांवर मचाण उभारणे, स्थानिक लोकांना प्रशिक्षण देणे, त्यांना तात्पुरते स्वरूपात कामावर घेणे व आवश्यक उपकरणे पुरवणे या उपाययोजनांचा समावेश असेल.
विशेष म्हणजे या वनवा मुक्ती उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर “जलदूत” शहानवाज शहा यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना सविस्तर निवेदन दिले होते. या निवेदनात डोंगराळ भागांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक सुविधा उभारण्याचे तसेच जिल्हा नियोजन आणि विकास परिषदेच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली होती. याच निवेदनाच्या अनुषंगाने हा शेतकरी मेळावा आयोजित केला जात आहे.
चिपळूण व गुहागर विभागातून प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवून, त्याचा यशस्वी परिणाम पाहून राष्ट्रपातळीवर आदर्श ठरणारी योजना रत्नागिरी जिल्ह्यात लागू करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. वनवा मुक्तीसाठी शेतकरी, स्थानिक प्रशासन आणि वनविभाग यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.