उल्का विश्वासराव यांचा साखरी नाटे येथील प्रस्तावित बंदरासाठी यशस्वी पाठपुरावा...

जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | एप्रिल १३, २०२३.
- महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची राजापूर तालुक्यातील साखरी नाटे, राजापूर येथील मच्छिमार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. साखरीनाटे येथे प्रस्तावित बंदरासाठी १४६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. कोकणातील राजापूर येथे मोठ्या प्रमाणावर मत्स्यव्यवसाय चालतो. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय मच्छिमारी असून अनेक जोडधंदे विकसित होत आहेत. सध्या बंदरात जवळपास ५०० बोटी उभ्या असतात. मात्र सुसज्ज बंदर झाल्यास या व्यवसायात अभूतपूर्व वृद्धी होईल. सन २०१५ पासून या बंदरासाठी उद्योग आघाडी, महिला समिती सहप्रमुख उल्का विश्वासराव यांच्या माध्यमातून या कामासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. आज मागील ७ ते ८ वर्षे सातत्याने पाठपुरावा करत असलेला प्रश्न मार्गी लागत आहे याचे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले.

- केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या एकत्रित निधीच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम होणार आहे. यामध्ये बंदरात आलेल्या बोटी नियोजनबद्धरीतीने उभ्या रहाण्यासाठी टर्मिनल, मासळी दीर्घकाळ टिकावी यासाठी आईस फॅक्टरी, उपहारगृहे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, फिश ऑक्शन हॉल या आणि अशा स्वरूपाच्या अनेक गोष्टींनी सुसज्ज असे फिशरीज हार्बर साखरीनाटे येथे उभारण्यात येणार आहे. यामाध्यमातून राजापूर व एकूणच कोकणातील मत्स्यव्यवसायाला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे.
- यावेळी मंत्री मुनगंटीवार यांना साखरीनाटे येथे येण्याचे व मच्छिमार बांधवांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले. शासकीय योजनांचे लाभ घेऊन आपला व्यवसाय वृद्धिंगत व्हावा यासाठी योग्य पाऊले उचलल्यास शासनाच्या माध्यमातून भरीव सहकार्य मिळते ही गोष्ट सर्वसामान्य व्यावसायिकांना उभारी देणारी आहे. यावेळी सौ. उल्का विश्वासराव यांच्यासोबत भाजपा रत्नागिरीचे माजी अल्पसंख्यांक अध्यक्ष श्री. अमजत बोरकर, मच्छिमार संघटनेचे श्री. शहादत हबीब, श्री. शफी वाडकर, श्री. मिर्झा पावसकर, श्री. अन्वर धलवेलकर, श्री. सलाउद्दीन हातवडकर, श्री. तन्वीर भाटकर, श्री. नदीम टमके, श्री. मलिक गडकरी, श्री. लियाकत शानदार, श्री. असिफ म्हसकर, श्री. फैरोज भाटकर आदी उपस्थित होते.