
रत्नागिरी : सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याप्रमाणेच मिऱ्या- कोल्हापूर- नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग नव्याने करण्यात येत आहे. परंतु या पूर्वीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यालगत डागडुजी करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय राजमार्ग परिवहन प्राधिकरणाच्या कोल्हापूर प्रकल्प संचालकांकडे ई मेलद्वारे मागणी केली आहे.
रत्नागिरी शहराला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग १६६ साळवी स्टॉप ते रेल्वे स्थानक यादरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकीस्वारांना वाहन चालवणे आता खूपच कठीण झाले आहे. कारण रस्त्याची पातळी समतोल नसल्यामुळे या मार्गावरून वाहन नेताना दुचाकी अथवा रिक्षा किंवा चारचाचाकी वाहन एका बाजूला ओढल्यासारखे होते. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. या मार्गावर कायमच वर्दळ असते. कोकणातील पावसाचा अंदाज घेता जर या रस्त्याची डागडुजी आत्ताच वेळेवर झाली नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे प्रवीण देसाई यांनी सांगितले.
मिऱ्या ते कोल्हापूर या महामार्गावर पांढरा समुद्र तिठा ते फिनोलेक्स कॉलनी या मार्गावरही खड्डे भरणे आवश्यक आहे. आपण याचा गांभीर्याने विचार करून तातडीने कार्यवाही करावी. या कामाबाबत कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याचे जाणवल्यास प्रसंगी उपोषणही करू, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे