
नेरळ:प्रतिनिधी (सुमित क्षीरसागर) पत्नीनेच प्रियकराच्या सोबतिने पतीचा खून केल्याची माहिती समोर आली.देव पाडा येथे राहणारा सचिन दत्तू मुरबे असे मयत व्यक्तीचे नाव आहे तर पत्नी अरुणा हिने प्रियकर ऋषिकेश तुपे याला सोबत घेऊन आधी बंदुकीच्या गोळीने ठार केले नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी म्हणून मृतदेह गावाच्या बाहेर जंगल परिसरात जमिनीखाली गाढण्यात आला.दरम्यान नेरळ पोलिसांनी मृतदेह शोधून काढत काही तासातच पत्नी व तिच्या प्रियकराला या खून प्रकरणात अटक केली. नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोशिर ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या देवपाडा येथे राहणारा सचिन दत्तू मुरबे हा 16 जुलै रोजी घरातून रात्री बाहेर निघाला होता.तर सचिन बेपत्ता असल्याची तक्रार सचिनची पत्नी अरुणा हिने नेरळ पोलीस ठाण्यात दिली होती.दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी 22 जणांची एक टीम तयार करून शोध मोहीम सुरू केली होती.

आज शनिवार सकाळ च्या सुमारास देवपाडा येथील गावाच्या काही अंतरावर जंगल परिसरात सचिनचा मृतदेह हा जमिनीखाली आढळून आला.सचिनच्या डोक्याच्या मागील बाजूला बंदुकीची गोळी लागली असल्याचे पोलिसांना दिसून आल्याने त्या अनुषंगाने नेरळ पोलिसांनी तपास सुरू केला असताना पोलिसांनी संशय म्हणून प्रथम गावात राहणारा ऋषिकेश तुपे या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता मयत सचिन याची पत्नी अरुणा हिचे आरोपी ऋषिकेश सोबत विवाह बाह्य प्रेम संबंध होते आणि त्यातूनच पती सचिन अडसर ठरत असल्याने दोघांच्या सहमतीने पतीचा काटा काढण्यात आला.त्यासाठी ऋषिकेश याने सचिनला त्या दिवशी जंगलात शिखारी साठी नेले होते आणि तेथेच वेळ साधून मागून ठासणीच्या बंदुकीने सचिनच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळी झाडून ठार केले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे सचिन आणि अरुणाचे प्रेम विवाह झालं होतं त्यात सचिन आणि अरुणाला चार मुले असून अरुणा कपडे शिवण्याचे काम करीत होती तर पती सचिन रिक्षा चालवून आपला सुखी संसाराचा गाढा हाकत होता. परंतु अरुणा हिचे गावातील राहणारा ऋषिकेश तुपे या सोबत विवाह बाह्य प्रेम संबंध होते. एकूणच या प्रकरणात अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे तर पोळीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक यांसह नेरळ पोलीस करीत आहेत.