*शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत १२ वी, डिप्लोमा व डिग्रीधारकांना विद्यावेतना दिले जाणार आहे….*
राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे. शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार, डिप्लोमा धारकांना ८आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठ्लाची महापुजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या पूजेसाठी मुख्यमंत्री कुटूंबासह पंढरीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी कृषी पंढरी २०२४ प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभातून विद्यार्थ्यांसाठी या योजनेची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना आणली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले राज्यभरातील माझ्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये दरमहा जमा होतील. काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं, पण लाडक्या भावाचं काय?त्याचं काय तर,त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार,आता बारावी पास झालेल्यांना ६ हजार, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार आणि डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजार रुपये महिन्याला स्टायपेंड दिला जाणार आहे. त्यामध्ये, वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो प्रशिक्षित होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे, इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विठ्ठलाच्या शासकीय महापुजेआधी पंढरपूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेतून महिला वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना काहीच दिलं नसल्याची टीका होत होती. आता मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजेचं औचित्य साधून विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे.