मुंबई / जनशक्तीचा दबाव- जगातील सर्वात लोकप्रिय चॅटिंग अॅप्सपैकी एक असलेलं व्हॉट्सअॅप आता आपल्या जीवनाचा एक मोठा भाग झालं आहे. केवळ मित्रांना किंवा कुटुंबीयांना मेसेज करण्यासाठीच नाही, तर ऑफिसच्या कामासाठी देखील कित्येक ठिकाणी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. यूजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप कित्येक नवीन फीचर्स देखील आणत आहे.
आता व्हॉट्सअॅपने आणखी एका नवीन फीचरवर काम सुरू केलं आहे. याच्या मदतीने जुने मेसेज शोधणं हे अगदी सोप्पं होणार आहे. जुने मेसेज शोधण्यासाठी व्हॉट्सअॅपने सर्च बारमध्ये एक कॅलेंडर अॅड केलं आहे. यामुळे एखाद्या ठराविक तारखेचे मेसेज आपल्याला शोधता येणार आहेत.
WABetaInfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. याठिकाणी व्हॉट्सअॅपच्या अपडेट्स बाबत माहिती दिली जाते. कंपनीने आपल्या एक्स हँडलवरून या नवीन फीचरची माहिती दिली आहे. सध्या हे फीचर केवळ बीटा 2.2348.50 या व्हर्जनवर उपलब्ध आहे. चाचणी झाल्यानंतर लवकरच हे सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कंपनीने काही दिवसांपूर्वीच एक नवीन सिक्युरिटी फीचर देखील लाँच केलं आहे. यामुळे व्हॉट्सअॅप कॉल करताना यूजर्स आपला आयपी अॅड्रेस लपवू शकणार आहेत. त्यामुळे समोरची व्यक्ती तुमचा कॉल कुठून येत आहे याचं लोकेशन शोधू शकणार नाहीत.