*नवी दिल्ली l 29 नोव्हेंबर-* स्मार्टफोनने अनेक कामे सुलभ झाली आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचे नवीन मार्गही उपलब्ध झाले आहेत. इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे अनेक प्रकारचे धोके आणि नव-नवे घोटाळे समोर येत आहेत. ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये लोकांच्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट ओटीपीचा वापर केला जातो. त्यामुळे अनेकवेळा लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अलीकडेच लोकांना फसवणूक आणि ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी अनेक उपाय लागू केले आहेत. येत्या १ डिसेंबरपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.
ट्राय नुसार, अनावश्यक प्रोमो मेसेजपैकी काही स्पॅम असू शकतात तर काहींच्या माध्यमातून सायबर स्कॅमर्सद्वारे फिशिंग अटॅक करीत आहे. बऱ्याचदा या मेसेजेसचा वापर स्कॅमर्स ओटीपीसारखी युजर्सची खाजगी माहिती मिळवण्यासाठी करतात. त्याचा वापर करून त्यांच्या बँक अकाऊंटपर्यंत पोहचता येते आणि पैसे चोरता येतात.
नवीन नियमांमुळे ओटीपी मेसेज येण्यास वेळ लागू शकतो. तुम्ही बँक किंवा रिजर्वेशन इत्यादी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्हाला उशिरा ओटीपी मिळू शकतो. ट्रायने हा निर्णय फेक ओटीपी मेसेजच्या माध्यमातून युजर्सच्या फोनचा अॅक्सेस घेणाऱ्या आणि त्यांना लुटणाऱ्या स्कॅमर्सना आळा घालण्यासाठी घेतला आहे.
दरम्यान, रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया (VI) सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी ट्रेसेबिलिटी नियमांचे पालन न करणारे मेसेज ब्लॉक करण्याच्या संभाव्य अडचणींवर चिंता व्यक्त केली होती. अनेक बँकांसह अनेक टेलिमार्केटर्स आणि बिझनेसेस या गोष्टींसाठी पूर्णपणे तयार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.