
जगातील सर्वात लांब ‘एक्स्प्रेस वे’ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक म्हणून हा प्रकल्प गणला जात आहे. हा एक्सप्रेसवे देशाची राजधानी दिल्लीला देशाची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडेल. १३८६ किमी लांबीच्या या ८ लेन एक्स्प्रेस वेला दोन राजधान्यांमधील प्रवास करण्यासाठी १२ तासांपेक्षा कमी वेळ लागेल.
या एक्स्प्रेस वेबाबत, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ट्विट करून त्याच्या बांधकामाविषयी अपडेट्स शेअर करत असतात. पुन्हा एकदा एक्सप्रेसवेच्या काही फोटोंसह ट्विट करत त्यांनी लिहिले की, ‘दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या वडोदरा-विरार विभागातील उत्कृष्ट दृश्य. समृद्ध भारतासाठी हे अंतर मर्यादित ठेवावे लागेल.’ १३८६ किमी लांबीचा दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग एकूण ८ लेनचा असेल.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर हेलिपॅडची सुविधाही असणार आहे. याशिवाय प्रत्येक १०० किलोमीटर अंतरावर ट्रॉमा सेंटर उभारण्यात येणार आहेत. जेणेकरून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळू शकतील. या द्रुतगती मार्गावर प्रत्येक ५०० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या महामार्गावर स्पीड ब्रेकर असणार नाही. या एक्स्प्रेस वेवर चालकांसाठी १२० किमीचा वेग निश्चित करण्यात आला आहे. यापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्यास ऑनलाइन चलन कापले जाईल.