काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी मी विहिरीत उडी मारेन, नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

Spread the love

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी एक किस्सा सांगताना हे सांगितलं आहे की एका बड्या नेत्याने मला काँग्रेसमध्ये प्रवेश करा असं सांगितलं होतं. त्यावेळी मी उत्तर दिलं होतं की एक वेळ मी विहिरीत उडी मारेन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. हा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगितला आहे.

भाजपाच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशाने मोठी प्रगती केली आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या तुलनेत जी कामं झाली त्याच्या दुप्पट कामं या ९ वर्षांमध्ये झाली असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे आणि मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी मी उत्तर प्रदेशात होतो. त्यावेळी मी तिथल्या लोकांना सांगितलं की २०२४ वर्ष संपेपर्यंत उत्तर प्रदेशातले रस्ते हे अमेरिकेतल्या रस्त्यांप्रमाणे असतील असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

गडकरींनी सांगितलेला तो किस्सा काय?

शुक्रवारी नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातल्या भंडारा या ठिकाणी एक भाषण दिलं. यावेळी त्यांनी ९ वर्षात मोदी सरकारने किती आणि काय काय चांगली कामं केली ते सांगितलं. तसंच त्यांनी जेव्हा राजकारण करायला सुरुवात केली होती त्यावेळी त्यांना काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकर यांनी दिलेल्या ऑफरविषयीही सांगितलं. श्रीकांत जिचकर माझ्या सुरुवातीच्या काळात एकदा मला म्हणाले होते. तुम्ही खूप चांगले कार्यकर्ते आणि नेते आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये आलात तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. यावर मी त्यांना म्हणालो की काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापेक्षा मी विहिरीत उडी मारणं पसंत करेन. कारण मला भाजपावर आणि भाजपाच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळेच मी भाजपासाठीच काम करतो आहे. नितीन गडकरी यांनी सुरुवातीच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जे काम केलं त्या आठवणींनाही उजाळा दिला. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही कौतुक केलं.

काँग्रेसविषयी आणखी काय म्हणाले नितीन गडकरी?

काँग्रेस हा असा पक्ष आहे ज्याचे अनेकदा तुकडे झाले आहेत. आपल्या देशाच्या लोकशाहीचा जो इतिहास आहे तो आपल्याला विसरता येणार नाही. तसंच भविष्यात चांगली वाटचाल करायची असेल तर भूतकाळातून आपण शिकवण घेतली पाहिजे. काँग्रेसने गरीबी हटाओचा नारा दिला होता. मात्र व्यक्तीगत लाभासाठी त्यांनी अनेक संस्था सुरु केल्या असंही यावेळी नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page