
मुंबई :- काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन व कुख्यात गुंड दाऊदशी करुन भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे यांची राजकीय उंची व पात्रता नाही. त्यांनी वाह्यात बडबड करणे थांबवावे अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करु, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
अतुल लोंढे म्हणाले, आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वाह्यात बडबड केली त्यावरूनच त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. दररोज कोणाला तरी अर्वाच्च शिव्या देण्यापलिकडे राणेंना काही येत नाही. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करून नितेश राणे यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. राहुल गांधी हे सरकारी घरातच राहून भारताविरोधात बोलतात असेही नितेश राणे म्हणाले होते त्यावर लोंढे म्हणाले,. राहुल हे दिल्लीत सरकारी घरातच राहतात, अंधेरीतील राणेंच्या राजमहालासारख्या अवैध बांधकाम केलेल्या घरात ते रहात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कारण ते गांधी आहेत राणे नाहीत. नेहरू-गांधी परिवाराने देशासाठी केलेला त्याग व बलिदान राणेसारख्या बुद्धीच्या लोकांना या जन्मात तरी समजणे शक्य नाही.