
तिरूअनंतपुरम- कोरोनाच्या महामारीतून सावरुन पुन्हा देश प्रगतीकडे झेपावत असतानाच आणखी एका विषाणूने डोकेदुखी वाढवली आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केरळमध्ये आत्तापर्यंत निपाहचे सहा रुग्ण समोर आले आहेत. निपाहाचा वाढता संसर्ग पाहता केरळमध्ये मिनी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दररोज लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टींची दुकानं सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त मेडीकल आणि दवाखाने यांना कोणत्याही वेळेची मर्यादा नाही. कोझीकोड जिल्ह्यात आठवडाभर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, संपूर्ण आठवडाभर ऑनलाइन वर्ग उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी दिली.आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, सध्या निपाह विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांच्या यादीत 1,080 लोक आहेत. आज संपर्कात आलेल्या 130 जणांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांपैकी ३२७ आरोग्य कर्मचारी आहेत. त्याचवेळी, इतर जिल्ह्यातील एकूण २९ लोक निपाह व्हायरसची लागण झालेल्या लोकांच्या संपर्क आलेले आहेत. वीणा जॉर्ज म्हणाल्या, त्यापैकी 22 मलप्पुरममधील, एक वायनाडमधील आणि प्रत्येकी तीन कन्नूर आणि त्रिशूर येथील आहेत. यापैकी 175 सामान्य लोक आणि 122 आरोग्य कर्मचारी उच्च जोखीम श्रेणीतील आहेत. आरोग्य मंत्री पुढे म्हणाल्या की, निपाह व्हायरसची लागण झालेल्या लोकांच्या थेट संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याच कारण म्हणजे 30 ऑगस्ट रोजी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निपाह चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला असल्याचं त्या म्हणाल्या.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात आणखी एका ३९ वर्षीय पुरुषाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले आहे. केरळमधील हा सहावा रुग्ण आहे. तर आत्तापर्यंत दोघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. निपाहचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकारकडून उपायात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. उपचारासाठी ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे आणखी 20 डोस खरेदी करणारआहे. तसेच केरळमध्ये संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे, कर्नाटक सरकारनेही आपली दक्षता वाढवली आहे. कर्नाटक सरकारने लोकांना प्रभावित जिल्ह्यांमध्ये प्रवास टाळण्यास सांगितले आहे. याशिवाय सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये तापावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.