
खेड : – तालुक्यातील घाणेखुंट येथील मुंबई-गोवा
महामार्गावरील एसएल फाटा लोटे येथे दिनांक ९ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता एक गंभीर अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा उलटली व त्यात बसलेले नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दशरथ शिंदे (वय ५७, व्यवसाय – रिक्षा चालक, रा. सोनगाव बागवाडी, ता. खेड) हे त्यांच्याच ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू-८८९७) चालवत पटवर्धन लोटे येथून पीरलोटे कडे प्रवासी घेऊन जात होते. त्यावेळी चिपळुणकडून भरधाव वेगात आलेला ट्रॅक्टर (क्र. एमएच ०८ एएक्स-६२४५) चालक अक्षय धोंडीराम जाधव (रा. सध्या आवाशी समर्थनगर, मुळगाव शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याने हायवे क्रॉस करताना रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात संतोष दशरथ शिंदे यांच्यासह अंजली अंथ सावंत, सुरेखा सुरेश सावंत, शैलेश सदानंद तांबे, ब्रिज किशोर चौरसिया, राहुल गुलाबचंद पाटील, संतोष हिराजी तांबे, विजयकुमार शेखर जैस्वाल आणि बिंदकुमार जितेंद्र सिंग हे सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. खेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.