
कोकणातील वीज प्रश्नावर सत्ताधारीआणि विरोधक हे एकत्र आल्याचं विधानसभेत दिसून आलं. नेमकं काय घडलं? वाचा….
मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज या आठवड्यातील शेवटचा दिवस आहे. दरम्यान, विधानसेभेत गेल्या चार दिवसांपासून विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक होत सरकारला धारेवर धरताहेत. तर आज विधानसभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्यांवरुन शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. निलेश राणेंच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि आमदार रोहित पवार यांनी उघडपणे पाठिंबा दर्शवलाय. निलेश राणे आणि भास्कर जाधव हे कोकणातील दोन नेते कट्टर विरोधक आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे नेते सोडत नाहीत. मात्र, आता कोकणातील गंभीर प्रश्नावर हे दोघेही एकत्र आल्याचं दिसून आलं.

…अन् सर्वांच्या भुवया उंचावल्या :
आमदार निलेश राणेंनी लक्षवेधी सूचनेद्वारे वीज वितरणात असलेल्या अडचणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल, वीजपुरवठ्याचा कमी दाब, आणि रखडलेले भूमिगत वीज प्रकल्प यावर आक्रमक होत सरकारला जाब विचारला. सभागृहात आक्रमक होत सिंधुदुर्गात वीज समस्या आहे, यावर सरकारने तोडगा काढला पाहिजे, असं आमदार निलेश राणे म्हणाले. तसंच महावितरण आणि ऊर्जा विभागाच्या कामकाजावर त्यांनी काही सवाल उपस्थित केले. या मुद्द्यावर शिवसेना – उबाठा पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही निलेश राणेंच्या मुद्द्याला उघडपणे पाठिंबा दर्शवला. त्यामुळं सगळेच चकीत होऊन सर्वांच्या भुवया उंचावल्या.
निलेश राणेंचे गंभीर आरोप :
दुसरीकडे सिंधुदुर्गातील वीज समस्याबाबत निलेश राणेंनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. यात महावितरणमध्ये 90 टक्के कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना कामाचे प्रशिक्षणही दिले नाही, असा आरोप निलेश राणेंनी केलाय. तसेच गेल्या काही दिवसांपासून काही कंत्राटी कामगारांचा मृत्यू झालाय. मात्र, कोणालाच मदत मिळाली नाही, असा गंभीर आरोप राणेंनी केला. 15 वर्षांपासून भूमिगत वायर टाकण्यासाठी रस्ते खोदलेत, पण अद्याप काम पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे, यासाठी सरकारनं ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं राणे म्हणाले.
बैठक आयोजित करून तोडगा काढू –
बोर्डीकर : राणेंच्या मुद्द्याला पाठिंबा देताना भास्कर जाधव म्हणाले की, “सिंधुदुर्गात वीज प्रश्न गंभीर आहे. राणेंनी योग्य मुद्दा उपस्थित केलाय.” तर ऊर्जा विभागातील ढिसाळ कारभाराला वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याचं आमदार रोहित पवार म्हणाले. या सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर यावर उत्तर देताना “कुडाळ-मालवण वीज प्रश्नावर लवकरच बैठक आयोजित करून तोडगा काढला जाईल,” असं आश्वासन मंत्री मेघना बौर्डिकर यांनी दिलं.