देवरूख- कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पादन होते. परंतु राज्यात काजूच्या बोंडापासून वाईन, फेणीनिर्मितीला मान्यता नसल्याने लाखो टन काजूची बोंडे वाया जात आहेत. कोकणात काही प्रमाणात काजू बीच्या टरफलापासून तेलनिर्मिती करण्याचे उद्योग सुरू आहेत. मात्र ९० % काजू बोंडे वाया जात आहेत. मात्र याच काजूच्या बोंडापासून देवरूखमधील क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर या तरूणाने पेय (सरबत) बनवले आहे. हे चवदार सरबत नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास निखिल यांनी व्यक्त केला आहे.
कोकण म्हटलं ही नारळी पोफळीच्या बागा, स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, आंबा, काजु, फणस आणि कोकणी मेवा डोळ्यासमोर येतो. कोकणात सर्वाधिक क्षेत्र हे काजु लागवडीखाली आहे. काजु लागवड केली की तिसऱ्या वर्षांपासून उत्पादन मिळायला सुरुवात होते. काजूपासून मिळणाऱ्या बीचा उपयोग केला जातो. मात्र, काजु बोंड पूर्णपणे वाया जाते. केरळ किंवा गोव्याच्या धर्तीवर या काजु बोंडावर प्रक्रिया उद्योग कोकणात आल्यास कोकणातील शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पादन तर वाढेल व कोकणच्या अर्थकारणात मोठी भर पडेल. त्यासोबत रोजगार निर्मिती सुद्धा कोकणात होईल.
काजू बोंड सुवासिक, रसाळ व पातळ सालीचे असते. आरोग्याच्या दृष्टीने ते खाण्यास उत्तम असते. काजू बोंडामध्ये संत्र्यापेक्षा ६ पट जास्त व्हिटँमीन सी असते. प्रोटीन्स, मोठ्या प्रमाणात फायबर, कँल्शीयम असते. त्यामुळे काजू बोंडापासून बनवलेले सरबत अत्यंत गुणकारी व आरोग्यदायी मानले जाते. काजू बोंड किडनी विकारावर अत्यंत गुणकारी मानले जाते. देवरूखमधील क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व तरूण व्यावसायिक निखिल कोळवणकर यांचे देवरूख बाजारपेठेत साईनाथ कोल्ड्रिंक्स हाऊस आहे. त्यांनी शासनाचे फळप्रक्रिया प्रशिक्षणही घेतले आहे. निखिल हे कोल्ड्रिंक्स हाऊस दुकानात बसले असताना क्रांती व्यापारी संघटनेचे सचिव अण्णा बेर्डे यांनी दुकानात काजूची बोंडे आणली. त्यावेळी त्यांना काजूच्या बोंडापासून पेय बनवण्याची संकल्पना सुचली.
लागलीच त्यांनी एका काचेच्या ग्लासमध्ये एका बोंडाचा रस काढून त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, सोडा, लेमन टाकून छान असे पेय तयार केले. हे पेय त्यांनी अण्णा बेर्डे, प्रशांत काबदुले, विलास मोरे व भाऊ शिंदे यांना पिण्यास दिले. यावेळी या तिघांनाही हे पेय उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय दिला. यानंतर निखिल यांचा विश्वास अधिकच दृढ होऊन त्यांनी हे पेय आपल्या कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये तयार करून ग्राहकांच्या पसंतीनुसार देण्याचे ठरवले आहे. तसेच बेरोजगार तरूणांना या पेयाचे स्टाँल लावायचे असल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची तयारीही निखिल यांनी दर्शवली आहे.
या पेयाची स्टाँलच्या माध्यमातून विक्री केल्यास बेरोजगार तरूणांच्या हाताला रोजगार मिळण्यास हातभार लागेल. कोकणात काजूचे बोंड हे मोठ्या प्रमाणात वाया जाते. परंतु काजू बोंड हे अनेक पोषणमूल्यांनी युक्त असून त्यात जीवनसत्व ‘क’चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे बोंड शरिराला आरोग्यदायी असे आहे. काजूच्या बोंडापासून आपण पेय तयार केले असून यासाठी आपल्याला देवरूख क्रांती व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले आहे. बोंडापासून पेय तयार करण्यासाठीचा खर्च अतिशय कमी आहे. त्यामुळे या पेयाच्या विक्रीतून चांगला फायदा होवू शकतो. बेरोजगार तरूणांनी या पेयाची स्टाँलच्या माध्यमातून विक्री केल्यास नक्कीच त्यांना चांगला नफा मिळेल. त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. यासाठी क्रांती व्यापारी संघटनेबरोबरच देवरूखमधील विजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश कदम यांनीही प्रतिष्ठानतर्फे आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे निखिल कोळवणकर यांनी ‘न्यूजमंत्रा’शी बोलताना सांगितले.