
मुंबई : महाराष्ट्रात सध्या सगळ्यांना पावसाची प्रतिक्षा असून जून महिन्याचे शेवटचे १० दिवस उरले असतानाही मान्सूनने अद्यापही दडी मारली आहे. शेतकरी, नागरिक उकाड्याने हैराण झालेले आहेत. त्यामुळे कधी एकदा पाऊस पडतोय अशीच वाट सगळेजण पाहत आहेत. मात्र, आता पुढच्या ५ दिवसांमध्ये राज्याचे वातावरण बदलणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भात मात्र आज-उद्यामध्ये उष्णतेचा तडाका जाणवेल.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तसेच विदर्भात २१ जून म्हणजेच आज आणि उद्या हवामान कोरडं असेल आणि उष्णतेचा तडाखा बसेल. तर यानंतर मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातही पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुण्यातही आज पावसाची शक्यता आहे. पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी मेघकर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा व विदर्भात २२ ते २३ जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे २५ जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाला शक्यता आहे, असेही औंधकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. खरंतर, पावसाच्या उशिरा दाखल होण्यामुळे पेरण्या खोंळबल्या आहेत. पण आता जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल.

इतकंच नाहीतर नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे तर गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मात्र आज तीव्र उष्णतेच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागतील. या ठिकाणी आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना हवामान खात्याचा अंदाज जाणून घेतच घराबाहेर पडा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.