
कर्जत[नेरळ]: सुमित क्षीरसागर


महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जावर मर्यादेत निपटारा होऊन सर्वसामान्य जनतेला अधिक चांगली व दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने १ ऑगस्ट महसूल दिनानिमित्ताने राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वरेडी व कोल्हारे या गावासाठी तलाठी कार्यालय मंजूर करण्यात आले असून या कार्यालयाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
राज्यभर महसूल सप्ताह या व्यापक अभियानातून विशेष मोहिमेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवितानाच विभागाचे लोकाभिमुख काम गतीमान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानात प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही महसूलमंत्र्यांनी केले आहे. त्यानुसार कर्जत तालुक्यात गेले अनेक वर्षे दहिवली तर्फे वरेडी व कोल्हारे या महसुली गावासाठी तलाठी कार्यालयाची हक्काची इमारत नव्हती त्यामुळे येथील कारभार नेरळ चावडी येथील तलाठी मंडळ कार्यालय किंवा भाडेतत्वावर असलेल्या खोलीतून चालत होता. शेतकऱ्यांना आपल्या सातबारा साठी काही वेळा गैरसोय देवही सहन करावी लागत होती. त्यामुळे महसूल सप्ताह अंतर्गत दहिवली तर्फे वरेडी व कोल्हारे या महसुली गावासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंच यांच्याशी बोलून महसूल विभागाने जागा निश्चित केल्या असून याठिकाणी तलाठी कार्यालय बांधण्यात येणार आहे. यासाठी शासनाने निधीची तरतूद केली असून या दोन्ही तलाठी कार्यालयाचा भूमिपूजन सोहळ दिनांक ०६ रोजी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला आहे.
यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, दहिवली तर्फे वरेडी सरपंच मेघा मिसाळ, कोल्हारे सरपंच महेश विरले, नेरळ ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश म्हसकर, मंडळ अधिकारी संतोष जांभळे, तलाठी विकास गायकवाड, नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, युवासेना तालुकाधिकारी अमर मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते भरत पेरणे, सोमनाथ विरले पपेश विरले आदी उपस्थित होते.