ठाणे- एकीकडे राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा जोर धरत असताना, एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या बालेकिल्ल्यात नवे मुख्यमंत्री कार्यालय उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यावर नजर ठेवण्यासाठी शिंदेंनी हे पाऊल उचलल्याचे कळते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नवे कार्यालय
ठाणे महापालिकेने यासंदर्भात एक निविदा प्रसिद्ध केली असून, ही निविदा फर्निचरच्या कामांसाठी काढण्यात आली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या निविदेमध्ये मुख्यमंत्री कार्यालय असा उल्लेख असल्याने लवकरच ठाण्यात मुख्यमंत्री कार्यालय उभे राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयात पालिका आयुक्तांच्या कार्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या कारभारावर, तसेच ठाण्यात सुरु असलेल्या विकासकामांवर थेट मुख्यमंत्र्यांचा वॉच राहण्यासाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे. याचा फायदा त्यांना महापालिका निवडणुकीतही होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील वागळे इस्टेट, कशिश पार्क भागात हे कार्यालय उभे राहणार आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ४ कोटी ६० लाखांचा खर्च केला जाणार आहे.