नेरळ: सुमित क्षीरसागर नेरळ पोलिसांनी बेकायदा जनावरांची तस्करी करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक मोहीम हाती घेतली आहे.पनवेल येथून नेरळ जवळील दामत येथे गुरे कत्तली साठी नेणारी बोलेरो पीकअप नेरळ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतली असता त्यात कोंबून नेण्यात येत असलेल्या तीन जनावरे यांची सुटका करण्यात आली.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पदभार घेतल्यानंतरची 15 दिवसातील ही तिसरी कारवाई आहे.
21ऑक्टोबर रोजी नेरळ पोलिस ठाणे हद्दीत सायंकाळी साडे चार वाजता एक बोलेरो जीप संशयास्पद रीतीने कर्जत कल्याण रस्त्याने प्रवास करीत होती.संबंधित गाडी बद्दल संशय आल्या पोलिसांनी ती एम एच 46 बी एम 3722 ही जीप थांबवली आणि चौकशी सुरू केली.पनवेल वारदोली येथील केशव निवृत्ती बताले हा आपली जीप गाडी घेवून दामत येथे चालला असल्याचे चौकशी मधून पुढे आले.
त्यावेळी पोलिसांनी त्या वाहनांची झडती घेतली असता त्या गाडी मध्ये तीन जनावरे कोंबून कत्तली साठी नेली जात असल्याचे आढळून आले.तर सदर पीकअप चालक हा दामत येथील एका व्यक्तीच्या सांगण्यावरून ती जनावरे दामत येथे नेत असल्याचे सांगितल्यावर नेरळ पोलिसांनी दमत गावात जावून त्या तरुणाचा शोध घेतला.त्यानंतर नेरळ पोलिसांनी सदर बोलेरो पिकअप नंबर एमएच / 46 / बी. एम. / 3722 मध्ये तीन गोवंशीय जातीची गुरे दाटीवाटीने कोंबुन चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना क्रूरपणे वागणुक देवुन नेली जात असल्याचा गुन्हा दाखल केला.
त्यानंतर त्या तिन्ही जनावरांना नेरळ पोलिसांनी कोंभल वाडी येथील गोशालेत पाठवून दिले. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी बोलेरी पीक अप चालक केशव निवृत्ती बतले यास प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यार्स प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (घ) (ड) (ज) व महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 1976 चे कलम 5 ( अ ) (ब), 9 प्रमाणे गुन्ह्यात अटक केली असून न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदर गुन्ह्यातील एकूण तीन लाख 80हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.त्यात 70हजाराची जनावरे आणि गाडी यांचा समावेश आहे. नेरळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 290/2023 या गुन्हा दाखल असून प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गद्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे अधिक तपास करीत आहेत.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी कत्तली साठी नेण्यात येत असलेल्या जनावरे यांच्यावरील सलग तिसरी कारवाई आहे.