
कर्जत-नेरळ : सुमित क्षीरसागर कर्जत
तालुक्यातील दोन नंबरची ग्रामपंचायत समजली जाणाऱ्या कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण होत आहे. तर या ग्रामपंचायत हद्दीतील बोपेले गावाकडे जाणारा रस्ता गेले अनेक वर्षे दुर्लक्षित असल्याने यावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले होते. नागरिक व वाहनचालकांची हि व्यथा जाणून कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले व त्यांच्या सहकाऱ्यानी हा विषय आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे लावून धरला होता. त्यामुळे या रस्त्यासाठी शासनाने १० कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच या रस्त्याचे कॉक्रीटीकरण पूर्ण होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा बिश्वास सोडला आहे.

नेरळ -बोपेले-
पिंपळोली-सुगवे-लोभेवाडी या प्रजिमा १०४ रस्त्यावरील नेरळ बोपेले दरम्यान गेले अनेक वर्षे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर पाण्याचे डबके निर्माण होऊन या रस्त्यावरून नागरिकांना चालणे मुश्किल होते. तर वाहनचालकांना वाहन चालवणे जिकरीचे होऊन बसते. बोपेले हे गाव कोल्हारे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असून नेरळ संकुल विकास प्राधिकरणात या गावाचा समावेश आहे. त्यामुळे नेरळ धामोतेसह बोपेलेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. अजूनही या भागात इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे या भागात रस्त्याची समस्या जटिल बनली आहे. त्यामुळे कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले, उपसरपंच नूतन भरत पेरणे, सदस्य साक्षी विरले, अस्मिता विरले, गीता मोरे, रोशन म्हसकर यांनी ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळ्यापासून ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर विशेष भर दिला होता. तेव्हा नेरळ बोपेले रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा व्हावा असा आग्रह महेश विरले यांनी धरून आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे मागणी करत याचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. तर तालुक्यात विकासाची गंगा आणून सर्वप्रथम माझ्या तालुक्यातील रस्ते सुस्थितीत यावे म्हणून प्रयत्न आमदार थोरवे यांनी देखील शासनाकडे या रस्त्यासाठी मागणी लावून धरली होती. त्यामुळे नेरळ -बोपेले- पिंपळोली-सुगवे-लोभेवाडी या प्रजिमा १०४ या रस्त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार बोपेले ते पिंपळोली या रस्त्यावरील खडीकरण पूर्ण झाले आहे. तर इतर ठिकाणी देखील कामे सुरु आहेत. तसेच नेरळ साईमंदिर ते बोपेले गावापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यासाठी शासनाकडून १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या या रस्ताचे काम निविदास्तरावर आहे तर लवकरच काम सुरु होण्याच्या मार्गावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्यामाध्यमातून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामे करण्यात सरपंच महेश विरले व उपसरपंच नूतन भरत पेरणे, सदस्य साक्षी विरले, अस्मिता विरले, गीता मोरे, रोशन म्हसकर यांना यश आले असून ग्रामपंचायत हद्दीतील बोपेले रस्त्यासाठी आमदार थोरवे यांच्याकडे सततचा पाठपुरावा आम्ही केला होता. तर आमदार थोरवे यांच्या माध्यमातून पाणी समस्या सोडवली आहे. तसेच अनेक रस्ते हे चकाचक झाले असून ग्रामपंचायत विकासाचे मॉडेल ठरावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे सरपंच महेश विरले यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

नेरळ -बोपेले- पिंपळोली-सुगवे-लोभेवाडी या प्रजिमा १०४ रस्त्यावरील नेरळ साईमंदिर ते बोपेले रस्त्यासाठी शासनाकडून तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा संपूर्ण सिमेंट काँक्रीटचा रस्ता असणार आहे त्यामुळे या भागातील रस्त्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल. सध्या निविदास्तरावर हे काम असून कार्यात आदेश प्राप्त होताच तात्काळ या रस्त्याच्या कमला सुरुवात केली जाईल.
::- संजीव वानखेडे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत

कोल्हारे ग्रामपंचायत हे आम्हला विकासाचे मॉडेल म्हणून सादर करायचे आहे. त्यासाठी येथील मूलभूत प्रश्नांना आम्ही कायम प्राधान्य दिले आहे. नेरळ साईमंदिर ते बोपेले रस्त्यासाठी आम्ही आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. त्यामुळे आमदार थोरवे यांनी देखील शासनाकडून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला. आजवर आमदार महेंद्र थोरवे यांचे कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत विकासासाठी सहकार्य झाले आहे. त्यांच्या माध्यमातून विकास साधण्यात आम्हाला यश येत आहे याचे समाधान आहे. तसेच रस्त्याचे काम सुरु होईपर्यंत या ठिकाणी खड्डे भरण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे यासाठी बांधकाम विभागाला कळवले आहे.
:- महेश विरले, सरपंच कोल्हारे ग्रामपंचायत