मुंबई :- बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी आपण त्यावेळी व्यवस्थापन संदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये उपस्थित होतो असंही सांगितलं आहे.
बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते बोलताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली पण तिथे अयोध्येमध्ये शिवसेना गेली होती का ? बाळासाहेब गेले होते का ? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.
चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, “त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय ? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते ? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते,” असं चंद्रकांत पाटील मुलाखतीवेळी बोलताना म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “बाबरी ज्यांनी पाडली ते शिवसैनिक नव्हते. मला महिनाभर नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, हरेंद्र कुमार आम्ही ३ राष्ट्रीय सरचिटणीसांना तिथं कॉम्बिनेशनमध्ये ठेवलं होतं. संध्याकाळच्या सभा होणं, संताची व्यवस्था वगैरे ठेवली होती. काहीही होवो, ढाचा पडो न पडो पण सगळ्यात शेवटी तुम्ही तिघांनी बाहेर पडायचं असं सांगितलं होतं असंही ते म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजप युतीत असून राज्यात त्यांची सत्ता आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे युतीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.