मुंबई- काल कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला दगडफेक, वाहनांची तोडफोड, बाटल्या-विटांचा वर्षावामुळे गालबोट लागले. सुरुवातीला संयमी भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी नंतर मात्र, आक्रमक भूमिका घेत लाठीमार, तीन ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविले. दगडफेकीत चार पोलिसांसह १५ जण जखमी झाले. दगडफेक प्रकरणी पोलिसांनी सुमारे ५० तरुणांना ताब्यात घेतले आहे. यावरुन आता शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही कोल्हापुरातील गोंधळावरुन आरोप केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, ‘कोल्हापूर सारख्या शहरात दंगल होणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. दंगली घडवून राजकारण करायचं आणि लोकांमध्ये, समाजामध्ये दरी निर्माण करुन निवडणुका लढायच्या हे तंत्र भाजपचे आहे. जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा त्यांना बजरंगबली आठवतात. हनुमान चालीसा आठवते. कर्नाटकात काहीच चालले नाही, शेवटी त्यांना औरंगजेब आणि टिपू सुलतान यांना शरण जावे लागले असं मला वाटते, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
‘संभाजीनगरमध्ये ४०० वर्षापूर्वी औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. तरीही त्याला भाजप पुन्हा पुन्हा जीवंत करत आहे, परत परत ते का काढत आहेत याच उत्तर भाजपने द्याव. कोल्हापुरात दंगल झाली, यात कोल्हापूर शहरातील लोकं नव्हते, बाहेरुन आलेले लोक जास्त होते. संगमनेरलाही तेच झाले. उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा असे प्रकार झाले नाहीत, तुमचे सरकार आल्यावरच असं का होतं आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर खरे दंगलखोर शोधा, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
‘तुम्ही गुंडाच्या मुसक्या आवळत नाहीत, तुम्ही तुमचे समर्थकांना वाचवण्यासाठी पोलिसांचा वापर करत आहात, निवडणुका जिंकण्यासाठी पोलिसांचा वापर होईल, असा आरोपही राऊत यांनी केला. आमदारांच्या अपात्रतेवर बोलताना राऊत म्हणाले, भविष्यात आमचा विधानसभा अध्यक्षांवर आहे, ते कोर्टाने दिलेल्या निर्देश आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून असलेल्या अधिकारावरुन ते निर्णय घेतील.