मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आमदार या नात्याने मतदारसंघातील विकासकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या आमदार निधीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करून त्यावर सही करण्यास विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी परवानगी दिली आहे.
मनी लाँडरिंग तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर व हस्तकाशी सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आमदार या नात्याने मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने आदेश देणे, विकासकामांसाठी आलेल्या आमदार निधीचे योग्य प्रकारे वाटप करणे न्यायालयीन कोठडीमुळे शक्य होत नसल्याने मलिक यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तसेच ही कामे करण्यास परवानगी देण्याची विनंती कोर्टाला केली होती. विशेष न्यायालयाने मलिक यांच्या अर्जाची दखल घेऊन त्यांची सदर मागणी मान्य केली आहे.