नवरात्र उत्सवातील दुर्गादेवी स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी कर्तुत्ववान नेतृत्वात झेप घेणाऱ्या महिला!
नारळाचा मोदक महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध झाला कोकणातील माभळे “गणेश हॉटेलचा “!
सासुबाईंकडून घेतला सुनबाईंनी नारळाचे दर्जेदार व इतर पदार्थ उत्पादनाचा आदर्श वसा!
जेव्हा स्त्रीला , संघर्ष करण्याची वेळ येते, तेव्हा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई आठवावी, व पुरुषाला संघर्षाची वेळ येते, तेव्हा छत्रपती शिवराय आठवावेत. बघा कसा संसार होतो. बळ मिळते घोरपडीचे! निसर्गात वादळ माणसाच्या जीवनात संकटे घेऊन येतात ,ती फक्त सांगून येतात, तर कधी अचानक पण येतात. पण म्हणून घाबरून जायचे नाही .तर झोकून द्यायचं असतं स्वतःला.!
कारण जिंकलो तरी लोक बघणार, आणि हरलो तरी लोक बघणार! पण पळ काढायचा नाही. याच प्रमाणे कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तर कष्ट, सातत्य, व जिद्द ठेवायलाच हवी. मग दुकान असो किंवा हॉटेल असो! अशा विचाराने हॉटेल सुरू करून व्यवसायाला जोड म्हणून, ” नारळाचे मोदक ” उत्पादन करून आपला व्यवसाय यशोशिखरावर नेऊन ठेवणाऱ्या कै. रंजना रघुनाथ घडशी यांच्या सुनबाई सुखदा सुनील घडशी!
सुखदा घडशी यांचा जन्म चिपळूण तालुक्यातील पालवण( सावर्डा )येथे मध्यम कुटुंबात झाला असून ,प्राथमिक शिक्षण पालवण येथे झाले .व पुढील पदवीचे शिक्षण सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे येथे झाले. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९९८ साली संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथील सुनील घडशी यांच्याशी विवाह झाला. पती सुनील घडशी तात्पुरते चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली येथे कंपनीत कामाला होते. परंतु तांत्रिक कारणामुळे हे काम सोडावे लागले.
सासुबाई रंजना घडशी यांना घरगुती पदार्थ करण्याची आवड असल्याने ,अगदी छोटेखानी नाश्ता स्वरूपाचे हॉटेल सुरू केले. सुखदा घडशी याकामी मदत करू लागल्या. सासूबाईंच्या हाताखाली काम करताना कोणता पदार्थ कसा करावा? प्रमाण कसे असते? त्यासाठी प्रथम काय करावें? अशा बारीकसारीक गोष्टी सासूबाईंप्रमाणे तंतोतंत सुनबाई सुखदा करायला शिकल्या. याचा अनुभव घेत काही वर्षानंतर “जेवण थाळी” सुरू केली. त्यामध्ये व्हेज नॉनव्हेज अशा प्रकारचा समावेश आहे.
सकाळी आठ ते रात्री साडेदहा पर्यंत हॉटेल चालू राहते. आत्ता सध्या सुमारे तीनशे ते चारशे थाळी जेवण जेवले जाते.
पंधरा वर्षांचा सासुबाईं सोबत पदार्थांचा अनुभवी,व कष्ट, अशांची सवय झाली. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये एक वेगळा पदार्थ म्हणजे “पाच नारळ” किसून त्यापासून मोदक करण्याचे काम सुरू केलें. त्या उत्पादनाचा खप चांगला होत गेला. पाच नंतर दहा नारळ, वीस नारळ, पन्नास नारळ, असे करताना आज दीड ते दोन हजार नारळाचे मोदक प्रकार चॉकलेट मोदक ,सिताफळ मोदक स्ट्रॉबेरी मोदक ,किवी मोदक ,आंबा मोदक ,काजू वडी , काजूकतळी , अंबावडी ,आंबा पोळी ,तसेच सर्व प्रकारचे लाडू ,खोबरेल तेल ,नारळ पाणी, मॅंगो ज्यूस अशी अनेक उत्पादने तयार करून खूप सुद्धा वाढवला. व ग्राहकांच्या हे सर्व पदार्थ दर्जेदार म्हणून एकदम पसंतीला उतरवले.
गणपती हंगामात अडीच हजार ते तीन हजार नारळाचे मोदक व इतर उत्पादने तयार केले ,तरी ग्राहकांना कमीच पडतात. म्हणूनच म्हणावेसे वाटते की,एका बीजे केला प्रारंभ,तया फळे आली आनंत!;या उक्ती प्रमाणे मोदकाची चव ग्राहकांच्या पसंतीस उतरून नारळ मोदकाची प्रसिद्धी महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर गेली आहे.,एक वेगळा खाऊ म्हणून पर्यटक या हॉटेलला भेट देऊन घेऊन जात असतात. नारळ मोदकाची सुरुवात झाल्यावर खप वाढत चालल्याने नारळ कमी पडत होतें. त्यासाठी गुहागरहून रात्री अपरात्री नारळ आणण्यासाठी पती सुनील यांचे मित्र संदेश कापडी यांनी खूपच सहकार्य केल्याचे त्या सांगतात. व त्यांच्या उपकाराची आठवण आजही जाणीवपूर्वक ठेवतात.
आज सुमारे ५०ते ५५ कर्मचारी या व्यवसायासाठी कार्यरत असून स्थानिक मंडळीच असल्याने त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. व त्यांची कुटुंबे व संसार चांगला चालत आहे. एकेकाळी आम्ही मंडळी रोजगाराचा शोध घेणारे होतो,पण आता आम्ही आमच्या कष्टाने इतरांना रोजगार देणारे झालो . याचे खूप समाधान वाटते.असे त्या आवर्जून सांगतात. असं म्हटलं जातं,की आयुष्यात माणूस यशस्वी झाला की त्याचे हात आभाळाला लागतात. पण आभाळाला हात लावून सुद्धा ज्याचे पाय सदा जमिनीवरच असतात ,तोच माणूस खर्या अर्थने यशस्वी होतो,असं म्हणायला हरकत नाही.या प्रमाणेच घडशी कुटूंबिय आज ग्राहक,कर्मरचारी वर्ग ,समाज व हितचिंतक यांच्याशी अगदी तितक्याच आपुलकीने वागतांना दिसतात.
अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे स्वच्छता व टापटीप व्यवस्थापन काम करण्यासाठी पाच सहा मुली रोजच घरच्या प्रमाणे आपले काम पार पाडतात. व जरी अचानक येथे कोणीही भेट दिली तरी , तरी येथे नाव ठेवायला जागा नसते.त्या मुली आपल्या या व्यवसायातील कर्मचारी नसून जणू आपले गुरुकुलच मानतात. अशा मुलींच्या प्रामाणिक पणाबद्दल सुमारे पाच-सहा मुलींचे आम्ही कन्यादान केल्याचेही ते सांगतात. काही कर्मचारी मुलगे किंवा मुली नोकरी करून चार मुली व दोन मुलगे नवनिर्माण कॉलेजमध्ये पदवीधर झाले आहेत. तसेच जोगले नावाचा कर्मचारी पदवी प्राप्त करून चिपळूण येथे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण करून पुणे येथे चांगल्या पदावर काम करत आहे. याचेही समाधान मिळाले ,हे आमचे भाग्यच आम्ही समजतो, असे त्या आवर्जून सांगतात.
एवढा अनुभव घेत असता सासुबाई रंजना घडशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पण सासूबाईंचे दुःख मागे टाकून त्यांनु केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे हा व्यवसाय सुरू ठेवला. कर्मचारी वर्ग नेहमी कोणतीही कुरकूर न करता अगदी खुशीने व आनंदी चेहर्याने दररोज काम करतात. विशेषतः माझे पती सुनिल घडशी हे माझ्याशी पूर्ण पाठीशी असून भक्कम आधारामुळे त्यांच्या कडून प्रोत्साहन मिळत आहे. प्रत्येक स्त्रीच्या पाठीशी अशी साथ मिळाली तर नक्की स्त्रीला भविष्यात खूप काही करता येईल,असं त्यांचं म्हणणं आहे.
या मोदक उत्पादन यशस्वीतेमुळे माझ्याप्रमाणे समाजातील इतर गरजू महिलांनी कष्ट ,सातत्य ,व जिद्द मनाशी बाळगून आपले प्रथम पाऊल आवड असलेल्या क्षेत्रात टाकले , व धीराने सामोरे गेलो तर आपण आयुष्यात कधीही कमी पडणार नाही. कोकणात काही करता येत नाही अशी ओरड थांबवून, कोणतेही काम करण्याची लाज न बाळगता मी काहीतरी करणारच ही जिद्द किंवा निश्चयाची गाठ मारली तर ,यश अजिबात लांब नाही!फक्त त्यासाठी हवी सकारात्मकता,व हवा मोठा आत्मविश्वास!
▪️लेख शब्दांकन-श्रीकृष्ण खातू/धामणी / संगमेश्वर/मोबा.नं.८४१२००८९०९