देशाच्या राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय आणि आयकरसारख्या संस्थांमध्ये आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलीय. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारीसह विविध मुद्द्यांना स्पर्श करत केंद्रातील तानाशाही शक्तीविरोधात लढा, असं आवाहन जनतेला केलंय.
मुंबई : भारत जोडो न्याय यात्रेची सांगता राहुल गांधी यांनी मुंबईत केली. 6700 किलोमीटर चाललेल्या या यात्रेची सांगता मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभेच्या रूपात झाली. यावेळी बोलताना देशभरातील विविध नेत्यांनी आपली मतं मांडली. मागच्या वर्षी आम्ही कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेची सुरुवात केली होती. ही यात्रा का करावी लागली? कारण देशात संवाद साधाण्याचं माध्यम जनतेच्या हातात नाहीय. देशात बरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे माध्यमांत येत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केलाय. या यात्रेत सामान्य नागरिकासह राजकीय नेते सहभागी झाले होते. सोशल मीडियावर देखील दबाव आहे. त्यामुळं आम्ही भाजपाविरोधात लढत आहोत, असं जनता विचार करतेय. मात्र, आम्ही भाजपासोबत लढत नाहीत. हे युवकांनी समजून घ्यावं. आम्ही मोदींच्या विरोधात लढत नसून भाजपाविरोधात देखील आम्ही लढत नाहीत. मात्र, आम्ही एका शक्तिविरोधात लढत आहोत. देशाच्या राजाची आत्मा CBI, ED च्या हातात आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
देश काही लोकांच्या हातात…
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “देश काही लोकांच्या हातात गेला आहे. देश केवळ 23 उद्योगपतींच्या हातात आणि 90 नोकरशाहांच्या मार्फत चालवला जातो आहे. यामध्ये एकही गरीब, दलित आणि आदिवासी आपल्याला दिसणार नाही. देशात केवळ हुकूमशाही सुरू आहे. महागाईने कळस गाठला आहे अशा वेळेस मोदी महागाई विरोधात काहीही बोलणार नाहीत, ते तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. मग ते पाकिस्तानमध्ये बघा काय केलं, चायनाकडे बघा काय केलं, असं म्हणत राहतील. पण या देशातील गरीब, शेतकरी यांच्याकडं पाहायला त्यांना वेळ नाही.
राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये…
“या देशाच्या राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये दडला आहे. पुन्हा एकदा ते ईव्हीएमच्या माध्यमातून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतील. ईव्हीएमसोबत असणारी पावती महत्त्वाची आहे. त्याची मतमोजणी व्हावी अशी आमची मागणी आहे. मात्र, त्याला यांचा विरोध आहे, जर यांच्यात हिम्मत आहे, तर त्या पावतीची मतमोजणी का केली जात नाही?” असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय.
विमानतळ बळकावलं…
“मुंबई विमानतळ कोणा एका उद्योगपतीला द्यायचे होते, त्यासाठी मोदी यांनी केवढा अट्टाहास केला. शेवटी हे विमानतळ अदानी यांच्या घशात घातलं. एका उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नासाठी दहा दिवसात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं केलं. शेतकऱ्यांसाठी काम करताना, गरिबांसाठी धावताना हे सरकार कधी आपल्याला दिसले होते का?” असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. “देशाचे नाव बदलण्याचा यांचा डाव आहे, कारण ते भारत सरकार म्हणत नाहीत तर मोदी सरकार म्हणतात. ईडी, सीबीआय आता गुंडांच्या हातात गेली आहे,” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. “देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आणि लढू पाहणाऱ्या सर्व सैनिकांचा अपमान या सरकारने केला आहे. अग्नीवीर योजना आणून देशातील तरुणांच्या स्वप्नांना उध्वस्त केलं,” असा घणाघातही राहुल गांधी यांनी केला.
नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान…
“देशात सगळीकडे जातीय संघर्ष पेरण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे. मणिपूरमध्ये असलेल्या संघर्षाकडे यांना पाहायला वेळ नाही. त्याच पद्धतीने देशभरात संघर्ष पेटवायचा आणि मग निवडणुका जिंकायचा हा यांचा डाव आहे. परंतु या देशातील जनता हे सर्व जाणून आहे. लोकांना प्रेम हवे आहे. गौतम बुद्ध, प्रभू श्रीराम यांनीसुद्धा प्रेमाचाच संदेश दिला. म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी या शक्तीविरोधात लढायला एकत्र आले पाहिजे. नफरत की बाजार में आपल्याला मोहब्बत की दुकान यशस्वी करायची आहे,” असे म्हणत राहुल गांधी यांनी जनतेला केंद्रीय शक्तीविरोधात लढण्याचं आवाहन केलं.
आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत….
याच शक्तिमुळं अनेक नेते भाजपात सहभागी झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केलीय. “देशाला नवीन व्हिजन द्यायचं असेल तर, यात्रेचा धारावीत समारोप होईल. मात्र, धारावीतील युवकांना हीच शक्ती बाहेर फेकतेय,” असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. “धारावी चीनमधील शहराचा मुकाबला करू शकते, मात्र, याच शक्तिमुळं धारावीतील युवकांचा विकास थांबला आहे. देशातील एकाही माध्यमाचा मालक दलित, अदिवाशी नाहीत. देश चालवणारे 90 लोक आहेत. त्यात तीन दलित, एक आदिवाशी आहेत, तर जनरलचा एकही व्यक्ती त्यात नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
EVM शिवाय मोदी निवडणूक जिंकणार नाहीत…
“EVM शिवाय मोदी निवडणूक जिंकणार नाहीत. याबाबत निवडणूक आयोगाला आम्ही EVM च्या मताबरोबरच कागदावरील मतांची मोजणी करण्याची मागणी केलीय. मात्र, निवडणूक आयोगानं नकार दिलाय. नरेंद्र मोदी याचं काम जनतेची दिशाभूल करण्याचं आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. देशात बेरोजगारी वाढतेय. देशाचा पैसा चीनसह देशातील उद्योगपतींना जातोय. त्यामुळं हे धारावीचा विकास होऊ देत नाहीत,” अशी टीका राहुल गांधींनी मोदींवर केलीय.
मोदींकडं भ्रष्टाचार खपवण्याची कला….
“मी मोदींना घाबरत नाही , असं ईडीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यांनी मला 50 तास बसून ठेवलं होतं. त्यामुळं माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी, आम्ही घाबरत नाहीत, नरेंद्र मोदींकडं भ्रष्टाचार खपवण्याची कला आहे. निवडणूक रोख्याबाबत तेच दिसून येत आहे. ईडी, सीबीआयच्या धाडी टाकून भाजपाला पैसा मिळतो,” असा आरोप राहुल गांधींनी केलाय. नोटबंदीमुळं देशातील रोजगार संपवला गेला. काही कंपन्यासाठी छोट्या व्यवसायांना संपण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. यात्रेतून अनेक प्रश्न मला समजले. तसंच जनतेचं प्रेम मिळालं, ते शब्दात सांगता येणार नाही. हा प्रेमाचा देश आहे, ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोले’ असं राहुल गांधी म्हणाले. सभेतून एम के स्टॅलिन, चंपाई सोरेन, कल्पना सोरेन, शरद पवार, तेजस्वी यादव, प्रकाश आंबेडकर यांच्यासह उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.