
नाशिक : राष्ट्रवादीचे माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या कन्या अमृता पवार यांनी नुकताच मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या आरोपांना जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे. अमृता यांचे आरोप तथ्यहीन असून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या असतानाही कायमच पक्षाच्या विरोधी भूमिका घेतली. त्या कायमच भाजपच्या संपर्कात राहिल्या, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमृता पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर फडणवीस यांनीही आम्ही बऱ्याच वर्षांपासून त्यांनी भाजपमध्ये यावे, यासाठी त्यांच्या मागे होतो, असे सांगितले. त्या अगोदर आल्या असत्या तर चित्र काही वेगळे दिसले असते. त्यांच्या येण्याने नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात भाजपला फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी अमृता पवार यांनी माजी पालकमंत्र्यांच्या त्रासाला कंटाळून हा पक्ष प्रवेश करीत असल्याचे सांगितले. भाजपमध्ये विकासाचे राजकारण असून देशाला एका वेगळ्या उंचीवर पक्ष घेऊन जात आहे. यामुळेच पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

