कर्नाटक- कर्नाटकमध्ये येत्या १० मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जवळ येत असल्यामुळे येथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर गंभीर आरोप करीत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाकडून प्रत्येक कामासाठी ४० टक्के कमिशन घेतले जाते. मोदी यांचे सहकारी भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, अशी टीका खरगे यांनी केली.
भाजपा पक्ष ४० टक्के कमिशन मागतो- खरगे
खरगे यांनी कर्नाटकमधील आलानंद येथे जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले. “मी भ्रष्टाचार करणार नाही आणि करूही देणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र खरे पाहता मोदी यांचे साथीदार भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. या भ्रष्टाचाराकडे मोदी दुर्लक्ष करतात. भ्रष्टाचार करणार नाही आणि करूही देणार नाही, हा नियम दुसऱ्यांना लागू आहे. मात्र भाजपा पक्ष सर्व कामांसाठी ४० टक्के कमिशन मागतो,” अशी टीका खरगे यांनी केली.
पुढच्या १५ दिवसांत भाजपाचे सरकार जाणार- डी. के. शिवकुमार
कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनीदेखील भाजपावर हल्लाबोल केला. येलाहांका येथील सभेत बोलताना पुढच्या १५ दिवसांत राज्यात भाजपाचे सरकार नसेल, असा दावा त्यांनी केला. “कर्नाटकमधील भाजपा सरकारकडून पोलीस आणि आयकर विभागातील अधिकाऱ्यांचा वापर केला जात आहे. या मतदारसंघात पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना छळले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना भाजपाचा झेंडा लावण्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांना मला सांगायचे आहे की कर्नाटकमध्ये पुढच्या १५ दिवसांत भाजपाचे सरकार नसेल,” असे डी. के. शिवकुमार म्हणाले.
निवडून आल्यास काँग्रेस पीएफआय, बजरंग दल संघटनेवर बंदी घालणार!
दरम्यान, काँग्रेसने येथे मंगळवारी (२ मे) जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काँग्रेसने कर्नाटकच्या जनतेला मोठी आश्वासने दिली आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध करताना मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आदी नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यात निवडून आल्यास पीएफआय आणि बजरंग दल या संघटनांवर आम्ही बंदी घालू, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
काँग्रेसला ‘बजरंग बली की जय’ म्हणणाऱ्यांची अडचण- मोदी
हाच मुद्दा घेऊन भाजपाकडून काँग्रेसवर टीका केली जात आहे. “अगोदर त्यांनी प्रभू रामांना बंद केले होते. त्यानंतर आता त्यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची शपथ घेतली आहे. काँग्रेसला प्रभू रामांची अडचण असून हे दुर्दैवी आहे. आता तर जे ‘बजरंग बली की जय’, म्हणतात त्यांचीदेखील काँग्रेसला अडचण होत आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.