चिपळूण येथील नांदिवसे ग्रामस्थांचे देवस्थान
ट्रस्टच्या विरोधात उपोषण

Spread the love

चिपळूण :- श्री स्वयंभू शंकर देवस्थान ट्रस्ट स्वयंदेव नांदिवसे ट्रस्टच्या विरोधात स्थानिक प्रशासनासह सहायक धर्मादाय आयुक्तांना निवेदन देऊनही कोणती कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नांदिवसे, स्वयंदेव, राधानगरी ग्रामस्थांनी आज, सोमवारपासून येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
नांदिवसे येथील मंदिराची ट्रस्टने दुरावस्था केली आहे. २०१९ पासून मंदिर जीर्णोध्दार करण्याचे ट्रस्टने ठरवताना ग्रामस्थांना विश्वासात घेतलेले नाही. मंदिराचे काम सुरु केले असले तरी सद्यस्थितीत ते काम पूर्ण बंद आहे. त्यामुळे सहायक धर्मादाय आयुक्तांनी कोर्ट कमिशन किंवा त्रयस्थ समितीची नेमणूक करून या ट्रस्ट व मंदिराची वस्तूस्थितीची पाहणी करावी. तसेच स्वयंभू शंकर मंदिर देवस्थान ट्रस्ट रद्दबातल ठरवण्यात यावा व मंदिराचा ग्रामस्थांना पूर्वीप्रमाणे ताबा मिळावा, अशी मागणी उपाेषणकर्त्यांनी केली आहे.
याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार, बैठका झाल्या असल्या तरी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आठ दिवसांपूर्वी उपोषणाचे पत्र देऊनही काही न झाल्याने ग्रामस्थांनी उपाेषणाचा मार्ग पत्करला आहे. तहसीलदार प्रवीण लोकरे, प्रांत कार्यालयाचे प्रकाश सावंत यांनी सोमवारी सकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, उपोषणकर्त्यांनी आपल्या मागणीवर ठाम राहत जोपर्यंत योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर जयवंत शिंदे, प्रकाश शिंदे, वसंत शिंदे, दिपक शिंदे, दत्ताराम शिंदे, शरद शिंदे, राजाराम शिंदे, भरत शिंदे, मधुकर शिंदे, श्रीकांत शिंदे, प्रकाश कदम, संतोष पवार, सुनील शिंदे, सुनील पवार, रामराव शिंदे, महादेव शिंदे, विनोद शिंदे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page