चिपळूण : शिवनदी पाठोपाठ आता वाशिष्ठी नदीलाही गाळमुक्त करण्यासाठी नाम फाऊंडेशनने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यातील शिल्लक गाळ उपशाची जबाबदारी खांद्यावर घेत दिवस-रात्र काम करून नामच्या यंत्रणेने आजपर्यंत ५० हजार घनमीटर गाळ नदीबाहेर काढला आहे. तर गोवळकोट धक्का परिसरातील बेट येेथे तब्बल २ लाख घनमीटर गाळ काढून येण्याजाण्यासाठी रॅम्प बनवला जात आहे.या कामाची रविवारी नामचे मल्हार पाटेकर यांनी पाहणी करीत कामाचा आढावा घेतला.
दि. १५ फेब्रुवारीपासून नाम फाऊंडेशनमार्फत शहरातील बाजारपूल येथील गणेश विसर्जन घाट, उक्ताड जुवाड बेट, गोवळकोट धक्का आदी ठिकाणी वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचे काम सुरू आहे. ९ पोकलेन व १५ डंपरच्या यंत्रसमुग्री यासाठी कार्यरत असून शासनाकडून इंधन पुरवठा केला जात आहे. जलदूत शाहनवाज शाह, नाम फाऊंडेशनचे सदस्य, जलसंपदा विभागाचे अधिकारी या कामावर लक्ष ठेवून आहेत. येत्या दोन महिन्यांनी पावसाळा सुरू होईल. त्यामुळे वाशिष्ठी नदीतून जास्तीत जास्त गाळ, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी बेटे काढण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत.