पू.स्वामी स्वरूपानंद,
नमस्कार |
परमेश्वराच्या नामाचा जप ही आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी एक सोपी साधना सांगितली आहे, कारण त्यासाठी कोणतेही बाह्य साधन लागत नाही. कोणतीही विशिष्ठ बैठक अपेक्षित नाही. निर्जन, एकांतातील असे एखादे अद्वितीय स्थान पाहिजे असते असेही नाही. इतकेच काय पण चार वाणींपैकी कोणत्याही वाणीने ती साध्य होऊ शकते. त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत करतां येते. जनाबाई जात्यावर दळण दळताना, गोरा कुंभार पायाने भांड्यांसाठी माती तुडवितांना, सावता माळी शेतामध्ये भाजी खुडतांना, रोहिदास चांभार चपला शिवतांना देवाचे नांव ‘वैखरीने’ घेत असत हे आपल्याला माहिती आहेच. मात्र असे करतांना त्यांचे संपूर्ण लक्ष त्या कामापेक्षांही नामावर एकाग्र असे. त्यामुळेच ते परमेश्वराच्या कायम संपर्कात असत आणि त्यांचे कार्य परमेश्वर स्वतः ‘त्यांच्यामार्फत’ करत असे. त्यामुळेच ते कामही उत्तमप्रकारे पार पाडले जात असे. परमेश्वराशी असा संपर्क साधला गेल्यामुळे जुन्या चुकीच्या कल्पना त्यांच्या अर्धज्ञात मनातून कायमच्या पुसल्या जात. बऱ्याच वेळा त्या नकारात्मक, स्वार्थी, निःपक्षपाती प्रेमाच्या परमेश्वरी नियमाच्या विरुद्ध असल्यामुळेच त्यांना प्रस्तुत अभंगात स्वामीजींनी त्यांना ‘पाप’ असे संबोधले आहे. हे सर्व आपोआप म्हणजे नकळत होत असे. त्यासाठी कोणताही विशेष प्रयत्न करण्याची गरजही भासत नसे. परमेश्वराच्या नियमाविरुद्ध कल्पनांचे उच्चाटन झाल्यानंतर मन आपोआप सकारात्मक, निःस्वार्थी, वैश्विक कल्याणाच्या कल्पनांनी भरून जात असे. हीच ‘आत्मशुद्धी’ होय. मार्गावर यापुढे गेलेले संत कबीर किंवा गोंदवलेकर महाराजांच्या संप्रदायाचे लोक ‘मध्यमेचा’ उपयोग करतात. स्वामींच्या नाथसंप्रदायाचे लोक ‘पश्यंती’ वाणी पसंत करतात. प्रयत्नाने साधक वैखरी वाणीकडून पश्यन्ती वाणीपर्यंत प्रगत होऊ शकतो. परावाणीचा अनुभव मात्र पूर्णपणे समर्पित झालेल्या योग्यांना, महान ईश्वरभक्तांना किंवा संतांना येतो.