पू. स्वामी स्वरूपानंद,
शुभदिनः |
आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला ‘ध्येयनिष्ठता’ आणि ‘वास्तविकता’ अशी दोन पथ्यें पाळायला सांगितलीं जातात. पहिली गोष्ट परमार्थाच्या बाबतीत पाळायची असून दुसरी प्रपंचात सांभाळायची असते. प्रयेक माणूस काही संन्यास घेऊ शकत नाही आणि ते आवश्यकही नसते. म्हणूनच त्याला प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजूंचा अवलंब करावा लागतो. दोन्हीमध्ये संतुलन संभाळणे हे त्याच्याच हातात असते. खरे पाहिल्यास परमार्थ ही वृत्ती आहे आणि प्रपंच ही कृती आहे. माणसाने प्रपंच आवश्यक इतकाच म्हणजेच आटोपशीर ठेवला तर तो परमार्थाकडे वळू शकेल. पण तो केवळ प्रपंचच करत राहिला तर त्याला परमार्थ साध्य करण्यासाठी वेळच उपलब्ध होणार नाही. शिवाय, शरीर आणि मन ही आपली दोन उपकरणे कशा प्रकारे उपयोगात आणायची? याचा विवेक सांभाळून जर प्रपंचाकडे फक्त शरीर आणि परमार्थाकडे मन लावले तर दोन्ही गोष्टी योग्य प्रकारे करणे शक्य होईल. सामान्य माणूस परमार्थाला सावत्र आणि प्रपंचाला सख्ख्या मुलाची वागणूक देत असतो. हेच जर उलट केले तर दोन्हींमध्ये संतुलन जुळून येईल. प्रपंच करतांनाच आपण परमार्थदेखील साध्य करू शकू. यासाठी स्वामीजींनी प्रस्तुत अभंगात कमळाचा दृष्टांत दिला आहे. कमळ सरोवरात राहत असले तरी तेथील चिखलाचा जराही अंश ते स्वतःच्या अंगाला लावून घेत नाही; ते नामानिराळे राहते. अशाच प्रकारे माझ्या म्हणजे पर्यायाने प्रत्येक माणसाच्या जीवाने प्रपंचापासून ‘अलिप्त’ राहावे असा संदेश ते आपणा सर्वांना देत आहेत.