मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)
पूर्व उपनगरातील चेंबूर येथील जिजामाता नगरातील खेळाच्या मैदानासह विविध कारणांसाठी आरक्षित असलेल्या मैदानांवरील ३२ अतिक्रमणे हटवण्यात आली. सुमारे ५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती.
चेंबूरमध्ये जिजामाता नगर परिसरात सीटीएस क्रमांक २१४अ/१, २१४अ/२, २१४बी, २२० आणि २२२ हे विकास नियोजन आराखडा २०३४ नुसार खेळाच्या मैदानासह विविध उपयोगासाठी आरक्षित आहेत. सुमारे ५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडांवर वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमित बांधकामे करण्यात आली होती. आरक्षणानुसार या भूखंडाचा वापर करण्याची गरज लक्षात घेऊन या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याची करवाई नुकतीच मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागाने केली.
उप आयुक्त हर्षद काळे आणि एम पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाईची मोहीम केली. १३ अभियंता, वेगवेगळ्या खात्यांचे १७ कर्मचारी, ५२ कामगार तसेच १ पोकलेन, ३ जेसीबी, ३ डंपर, सदर जागेवरील सर्व ३२ अतिक्रमित बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. या कारवाई प्रसंगी आरसीएफ पोलीस ठाण्याने पोलीस बंदोबस्त पुरवला होता. ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर, एम पश्चिम विभाग कार्यालयाने कार्यकारी अभियंता (पदनिर्देशित अधिकारी) आणि सहायक उद्यान अधीक्षक यांना सदर भूखंड संरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी कळवले आहे. आरक्षित प्रयोजनांसाठीच सदर जागा वापरात येईल, याची महानगरपालिका प्रशासन खातरजमा करेल, अशी माहिती सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.
जाहिरात :