
रत्नागिरी: गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा अखेर मुहूर्त सापडल्याने मुंबई ते कोकण हा प्रवास आता सुकर होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर रो-रो फेरीसेवा सुरू होण्याची शक्यता असल्याने कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
मुंबई ते रत्नागिरी – सिंधुदुर्ग यादरम्यान प्रवासी व वाहनांसाठीची रो-रो फेरीसेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी सुरू असून, सागरी महामंडळाने कंबर कसली आहे. काही महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती. गणेशोत्सवात ही सेवा सुरू होईल, अशाप्रकारे नियोजन सुरू होते, मात्र आता सर्व परवानग्या मिळाल्या असून, समुद्रस्थितीही अनुकूल होत आहे.


सागरी महामंडळाने बोटीची सेवा सुरुवात करण्यासाठी तांत्रिक व प्रशासनिक तयारी पूर्ण केली आहे. जेट्टीवर प्रवाशांसाठी बैठकीची सोय, वाहनांसाठी स्वतंत्र लोडिंग-विचार केंद्र, तसेच सुरक्षित उतार व चढाव यासाठी योग्य उपाययोजना केली जात आहे. जयगड आणि विजयदुर्ग येथे जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच हवामान अहवालावर नजर ठेवून समुद्रस्थिती अनुकूल असल्यास ताबडतोब सेवा सुरू करण्याचे प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी कोकणात आपल्या गावी जाण्यास निघतात. महामार्गावर तासनतास होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, रेल्वेत तिकिटासाठीची धावपळ यामुळे प्रवास त्रासदायक ठरत होता. रो-रो सेवेमुळे सुरक्षित, जलद व आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.
सेवा कशी असेल?..
भाऊचा धक्का (मुंबई) येथून जयगड आणि विजयदुर्गपर्यंत या बोटी धावणार आहेत. यात प्रवासाची वेळ मुंबई ते रत्नागिरी ३ ते ३.५ तास, मुंबई-सिंधुदुर्ग ५ तास इतकी असणार आहे. २५ नॉट्स वेगाने ही बोट प्रवास करणार असून दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट असेल.
मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मार्गावर रो-रो सेवेची प्रायोगिक चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. वेग, प्रवासी क्षमता व सुरक्षा तपासणी समाधानकारक ठरली असून, सागरी सुरक्षा यंत्रणांकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर