
मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचा दुचाकी रॅली काढून शासनाला इशारा
मुंबई : कामोठे टोल नाका ते खारपाडा टोल नाका दुचाकी (बाईक) रॅलीचे आयोजन रविवार दि. ७ मे २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता नवी मुंबई गोवा जन आक्रोश समिती तर्फे करण्यात आले होते. मुंबई गोवा महामार्गाचे काम १२ वर्षे रखडलेले असून मंत्रीमहोदय यांची आश्वासने, न्यायालयाचे आदेश यांना प्रशासनाने हरताळ फासला आहे. या दिरंगाई आणि ढिसाळपणामुळे अपघातात ३००० पेक्षा जास्त कोकणकर मृत्युमुखी पडले आहेत तर अनेकजण कायमचे जायबंदी झालेले आहेत. या निषेधार्थ काढलेल्या या दुचाकी रॅलीला कोकणवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ही रॅली शिस्तबद्धपणे यशस्वीरित्या पार पडली.

रॅलीची सुरुवात कामोठे टोल प्लाझा येथून दुपारी ४.०० वाजता झाली. वाहतूक उपायुक्त यांनी रॅलीच्या सूचना दिल्यानंतर समितीचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नागरिक श्री. देवरुखकर यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून Flag off करण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या आणि समितीच्या पायलट व्हॅन रॅलीचा मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने जाऊन खारपाडा टोलनाका येथे रॅली ची सांगता झाली .
खारपाडा टोल येथे हॉटेल वैष्णवीच्या पटांगणात रॅलीची समारोप सभा झाली .
याबाबतीत आपले विचार मांडताना श्री. संतोष ठाकूर यांनी यापुढे मुंबई गोवा महामार्गाच्या निमित्ताने झालेला अन्याय सहन केला जाणार नाही आणि समितीच्या पुढच्या प्रत्येक आंदोलनात माझे किमान ५०० कार्यकर्ते घेऊन सहभागी होईन असे जाहीर केले. कोकण विकास युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री. अजय यादव यांनी आपले विचार मांडताना जन आक्रोश समिती या महामार्गासाठी जे काही आंदोलन करत आहे ते कौतुकास्पद आहे आणि सर्व कोकणकरांनी स्वतःहून यात लाखोंच्या संख्येने सामील व्हायला हवे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच सर्व कोकणकरांनी यापुढे सामील व्हावे असं आवाहन केलं. महामार्गाचे काम पूर्ण न होण्यास कंत्राटदाराबरोबरच अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत आणि त्यांना जाब न विचारणारे त्यांच्यावर अंकुश न ठेवणारे राजकीय नेतृत्व जबाबदार आहे. राजकीय नेत्यांना आपण निवडून देतो आणि म्हणूनच त्यांच्यावर या कामासाठी दबाव ठेवण्याची जबाबदारी अप्लाय सर्वांची आहे. अलिबाग न्यायालयात वकिली करणारे अॅडव्होकेट अजय उपाध्ये हे देखील आपले विचार मांडताना म्हणाले की, मी 2016 पासून महामार्ग संदर्भात अलिबाग न्यायालयात मी लढा देत आहे ज्यावेळेस शासनाच्या वतीने एक अहवाल येतोय की मुंबई गोवा महामार्ग पूर्णतः प्रवासासाठी योग्य आहे व कोणते खड्डे नाहीत परंतु प्रत्यक्षात आपण कोकणवासियांनी पाहिले तर महामार्गाला रस्ताच नाही अशी अवस्था आहे यासाठी समस्त कोकणकर अराजकीय अजेंडा घेऊन जे काही करत आहेत त्याला आमचा पूर्णता पाठिंबा राहून आम्ही समस्त कोकणकरांसोबत तीव्र आंदोलनात सामील होऊ.

समितीचे सचिव श्री. रुपेश दर्गे यांनी आपले विचार मांडताना जन आक्रोश आंदोलन ही सर्वसामान्य कोकणवासियांची एक समिती म्हणून महामार्गासाठी काम करीत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता किंवा कोणत्याही राजकीय अजेंडा न घेता महामार्गासाठी लढत आहेत. जर शासन, प्रशासन व ठेकेदार यांनी दिलेल्या मुदतीपर्यंत म्हणजे 31 मे 2023 पर्यंत एक मार्गी काम पूर्ण न केल्यास शिवराज्याभिषेक दिनी शिवरायांचे आशीर्वाद घेऊन आम्ही समस्त कोकणकर आणि समस्त कोकणातील सर्व संघटना एकत्रित निर्णय घेऊन एकाच दिवशी एकाच वेळेस संपूर्ण कोकणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे जाहीर केले.
खारपाडा गावचे सरपंच श्री . दयानंद भगत यांनी महामार्गाच्या लगतच्या सर्व गावात ग्रामपंचायतीत जनजागृती केल्यास त्यासाठी समितीला सर्व सहकार्य करू आणि समितीच्या यापुढील उपक्रमात आम्ही सर्व सहभागी होऊन पाठिंबा देऊ असे जाहीर केले.
सभेच्या समारोपाच्या वेळी समितीचे कार्याध्यक्ष Adv. सुभाष सुर्वे यांनी मागील १३ वर्षे महामार्गाचे काम रखडले याला जबाबदार कोण ? कोकणाचा विकास त्यामुळे रखडला त्या जबाबदार कोण ? अपघातात ३३०० लोकांचा मृत्यू आणि ११००० लोक अपंग झाले त्याला जबाबदार कोण ? महाराष्ट्रात इतर ठिकाणी अपघात झाला तर त्यांना नुकसान भरपाई मिळते आणि महामार्गावरील अपघातात मृत्यू पडले त्यांना भरपाई दिली जात नाही याला जबाबदार कोण ? हजारो झाडांची कत्तल झाली आणि नवीन झाडे लावली गेली नाहीत याला जबाबदार कोण ? कंत्राटदार काम अर्धवट टाकून पळून गेले त्यांना नोकर्यादेश द्यायला जबाबदार कोण ? रस्ता आता होईल तेव्हा होईल पण या सगळ्यांना जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाचं खटला दाखल करण्यात यावा व त्यासाठी चौकशी समिती नेमून जबाबदार कोण हे निश्चित करण्यात यावे . समितीची पुढची वाटचाल करताना पळस्पे ते झाराप या महामार्गावरील सर्व ग्रामपंचायतीमधून जन-जागृती करून या सामाजिक जनचळवळीला सर्वसमावेशक व्यापक स्वरूप येईल आणि त्यातून मग पुढचा लढा आखण्यात येईल असे जाहीर केले.
मुंबई गोवा जन आक्रोश समितीतर्फे या बाईक रॅलीचे चांगल्या पद्धतीने नियोजन अन् आयोजन करण्यात आले. या रॅलीला सहकार्य करणाऱ्या वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांचे जाहीर आभार मानण्यात आले . या रॅलीच्या आयोजनासाठी समितीचे कार्याध्यक्ष ॲड. सुभाष सुर्वे, सचिव रुपेश दर्गे, ॲड. संदीप विचारे, डॉ. अमित चव्हाण, श्री. संजय सावंत, सी. ए. संदेश चव्हाण , सौ. सोनल सुर्वे व इतर मान्यवरांनी दिवसरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम समितीच्या सदस्यांना सोबत घेऊन यशस्वी केला