नागपूर :- २०१४ पासून रखडलेला मुंबई- गोवा महामार्ग येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल व जानेवारीपासून नव्या वर्षात हा मार्ग सुरू होईल, असा विश्वास केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यासोबतच आजवर अनेक अडचणींचा सामना करताना हे काम रखडले, याविषयी कुणालाही दोष न देता मीच याला जबाबदार असल्याचे सांगत जबाबदारी घेतली. अभिनेता प्रशांत दामले यांनी घेतलेल्या एका प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.
यानिमित्ताने भूसंपादन ते कॉन्ट्रॅक्टर बदलणे अशा अनेक अडचणी आल्या असल्या, तरी मी कुणालाही जबाबदार धरत नाही. मी स्वतःला जबाबदार धरतो, अनेक रस्ते झाले, पण हा महामार्ग होऊ शकला नाही. याला मी स्वतः जबाबदार आहे, असेही गडकरी यांनी प्रांजळपणे कबूल केले. हा रस्ता राज्य शासन पूर्ण करणार होते. त्यावेळी छगन भुजबळ हे मंत्री असताना निविदा प्रक्रिया झाली. कामे दिली गेली, मात्र ठेकेदार बदलले, इतरही खूप अडचणी आल्या. पण यासाठी मी कुणालाही जबाबदार धरत नाही. तर मी स्वतः जबाबदार आहे. आयुष्यात मी सर्वाधिक रेकॉर्डब्रेक बैठका याच मार्गासाठी किमान ७५ ते ८० बैठका घेतल्या. आता डिसेंबरच्या आत हा रस्ता पूर्ण होईल आणि जानेवारीत तो सुरू होईल, असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.