
मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंतचा रस्ता हा अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. 12 एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
रायगड : येत्या 12 एप्रिल रोजी मुंबई – गोवा महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंतचा रस्ता हा अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे त्या दिवशी रायगडला येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ही माहिती दिली.
किल्ले रायगडावर शनिवारी 12 एप्रिल रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 345 वी पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी हजारो नागरिक किल्ले रायगडावर उपस्थित राहणार आहेत. या काळात अपघात आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनाना बंदी घालण्यात आली आहे.
कसा असेल वाहनांच्या बंदीचा कालावधी?
दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री 1 ते दुपारी 3 वाजेपर्यत या महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी असणार आहे.
या वाहनांना बंदीतून वगळले..
अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलिस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहिका, तसेच महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी येणारी वाहने यांना मुभा असणार आहे.