राष्ट्रविरांचे विचार अनुसरावेत- सुमेधा चिथडे
देवरूख- छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रकार्यातून स्फूर्ती घेऊन आपल्या देशासाठी, शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत उत्तुंग कार्य करणाऱ्या सौ. सुमेधा चिथडे यांचे *‘राष्ट्रकार्यासाठी माझे योगदान’* या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने केले होते. व्याख्यानाच्या सुरुवातीला सौ. चिथडे यांनी शहीद स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यानंतर शहीद स्मारक स्थळ व परमवीर चक्र दालनाविषयीची माहिती जाणून घेतली.
राष्ट्रपुरुषांचे कार्य व विचार तरुण पिढीपर्यंत पोचवणे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रसेवा हीच ईश्वरसेवा आहे. मनातील ध्येयामुळे राष्ट्रभक्तीची अफाट शक्ती निर्माण होते. चांगल्या कार्याला समाजाचे पाठबळ मिळतेच, पण हेतू शुद्ध हवा. राष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी झटणाऱ्या सैनिकाचे विचार जगण्यात असावेत. ते कृतीत आले तर जगणे सुंदर होते.” असे विचार सुजाता चिथडे यांनी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मांडले. पुण्यात शिक्षिका म्हणून अध्यापन करणाऱ्या सुमेधा चिथडे व वायुदलात असणारे त्यांचे पती योगेश चिथडे यांनी वीरपत्नी व वीरमातांसाठी स्वेच्छेने व स्वखर्चाने सन २०१७ मध्ये सोल्जर्स इंडिपेंडेंट रीहॅबिलिटेशन फाउंडेशन (सिर्फ) संस्थेद्वारे मदत कार्य सुरु केले. त्यानंतर ऑक्सिजन अभावी सैनिकांना आपले प्राण गमवावे लागतात, हे जाणून घेतल्यावर त्यांनी सियाचीन व जम्मू येथे ऑक्सिजन प्लांट उभारून सैन्यदलाला अर्पण केले. आता तिसरा प्लांट उभारण्याचे त्यांचे कार्य चालू आहे. आपल्या कार्याविषयी माहिती देताना त्यांनी प्रत्यक्ष रणभूमीवर जवान कसे लढतात व त्यांच्या शौर्यामागे कोणती प्रेरणा असते.
त्यांच्या मागे राहणाऱ्या वीरपत्नी वा वीरमाता डोळ्यांतून अश्रूही न ढाळता आलेल्या आपत्तीशी कसा धीटपणे सामना करत असतात, याचे चित्र डोळ्यांसमोर उभे केले. आपला वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे, विचारसरणी, वैयक्तिक अडचणी यांचा बाऊ न करता, अहोरात्र देशाच्या आणि देशवासीयांच्या रक्षणासाठी झटणारी सैन्यदले कधीही संपावर जात नाहीत. हे देशाचे खरे हिरो असायला हवेत” असे प्रतिपादन सुमेधाताईंनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी अध्यक्षीय समारोपात आपल्या प्रामाणिक व निस्पृह कार्यातून राष्ट्रसेवेचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या सुमेधाताईंचा आदर्श प्रत्येक नागरिकाने ठेवायला हवा. असा संदेश देत सुमेधाताईंच्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. या व्याख्यानाचे आयोजन आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या स. का. पाटील सभागृहात करण्यात आले होते. सुमेधाताईंच्या व्याख्यानास संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत, सचिव शिरीष फाटक, उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर या व्याख्यानाला बहुसंख्य विद्यार्थी, नागरिक व महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.