
जे डी पराडकर/संगमेश्वर- संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कुल कला विभागाने उभारलेल्या कलावर्ग आणि कलादालन उपक्रमास आज सन २००४-०५ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रशालेतील विविध कला विषयक उपक्रम पाहून माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रशालेच्या कला विभागाच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन प्रशालेत सुरु असणाऱ्या विविध कला विषयक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. कलावर्ग, कलादालन उभारल्या नंतर विद्यार्थ्यांना याचा कसा उपयोग झाला, याची कला विभागामार्फत माजी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कला विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या डिजिटल कला शिक्षण उपक्रमाची माजी विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती घेतली. सन २००० साली सुरु करण्यात आलेल्या कला साधना या चित्रकला वार्षिक उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी कलासाधनाचे सर्व वार्षिक आणि त्यातील चित्रं पाहून विद्यार्थ्यांच्या कला विषयक प्रगतीचे कौतुक केले.
प्रशालेच्या कला विभागातर्फे उभारण्यात आलेले कलादालन हे एक आदर्श कलादालन असून हे पाहण्यासाठी आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून कलारसिक आणि पर्यटक येतात ही संस्था आणि शाळेच्या कलाविभासाठी अभिमानाची बाब असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी नमूद केले.
प्रशालेत नवीन ईनव्हर्टर घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना रंगपेटी आणि अन्य कला विषयक साहित्य देण्यासाठी सन २००४-०५ च्या माजी विद्यार्थ्यांनी देणगी दिली. कला विभाग, प्रशाला आणि संस्था यांच्या वतीने या सर्व माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद देण्यात आले.