मुंबई- शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. या अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले आहे. एनडी आरएफचे पथक याठिकाणी पोहचले असून बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.
दुर्घटनेने दु:ख झाले – पंतप्रधान
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेने दु:ख झाले. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन अपघाताच्या ठिकाणी काम करत असून बाधितांना योग्य ती मदत मिळावी यासाठी सर्व शक्य उपाययोजना केल्या जात आहेत.
केंद्राच्या वतीनेही आर्थिक मदत
या अपघातात प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये दिले जातील. तर जखमींना 50,000 हजा रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे.