
गुहागर :- तालुक्यातील मोडकाआगर धरण तुडुंब भरले असून मे महिन्यातच धरण तुडुंब भरण्याची पहिलीच वेळ असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. प्रतिवर्षी जून महिन्यात जोराचा पाऊस पडल्यास या महिन्यात धरण तुडुंब भरत असते. परंतु यावर्षी मान्सूनपूर्व पडलेल्या पावसाने हे धरण तुडुंब भरले आहे.
मोडकाआगर धरणातून वरवेली, गुहागर, असगोली, पालशेत, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेअंतर्गत धरणालगत असलेल्या विहिरीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणामुळे पाणीटंचाईचा सामना अजूनही ग्रामपंचायतीला करावा लागला नाही. एवढे पाणी या धरणामध्ये असते. परंतु यावर्षी धरण पूर्णपणे भरून गेले आहे. या धरणामध्ये विशाल बोटिंग क्लबच्या माध्यमातून जलविहार पर्यटन चालवले जाते. गेली १८ वर्षे या ठिकाणी पर्यटकांसाठी विनाप्रदूषण जल पर्यटन बोटिंग क्लब व्यवसाय सुरू आहे. परंतु गेल्या १८ वर्षांमध्ये मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडलेला नाही. तसेच मोडकाआगर धरण कधीच मे महिन्यात तुडुंब भरले नसल्याचे विशाल बोटिंग क्लबचे विश्वनाथ रहाटे यांनी सांगितले.