दिवा : दिवा पूर्वेला रेल्वेचे तिकीट घर व्हावे अशी मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करत होते. ही मागणी रेल्वे कडून मंजूर होत या ठिकाणी नवीन तिकीट घर बांधण्यात आले. या तिकीट घराचे उद्घाटन नुकतेच शिवसेनेकडून करण्यात आले. आता यावरूनच मनसेने शिवसेनेला टोला लगावला असून
तिकीट घराचे काम आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नाने झाले असून त्याचे श्रेय शिवसेना घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला मनसेचे विभाग अध्यक्ष तुषार पाटील यांनी लगावला आहे. घर सुरू व्हावे यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राजू पाटील यांच्या प्रयत्नामुळेच दिवा शहरातील नागरिकांना पूर्वेला तिकीट घर उपलब्ध झाले. तिकीट घराच्या जागेचा प्रश्न सोडवण्यापासून सर्वच बाबतीत आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा व प्रयत्न केले, मात्र तिकीट घराचे उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक धावत असून प्रत्येक गोष्टीत श्रेय घेण्याची वृत्ती या लोकांची असल्याचे तुषार पाटील यांनी म्हटले आहे.
ज्यांनी यांना पक्षात मोठे केले, त्याच पक्षाचे नाव आणि चिन्ह ज्यांनी पळवले ते मनसेने दिव्यात केलेले काम आता पळवायला लागले आहेत असा सणसणीत टोला दिवा मनसेचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी लगावला आहे. तुषार पाटील यांनी याबाबत बोलताना म्हटले की दिवा टर्निंग येथे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नानेच व मागणीनुसार सार्वजनिक शौचालय होत असून त्याची पाहणी करायला माजी उपमहापौर पुढे पुढे धावतात
पण माजी उपमहापौर यांनी जे शौचालय बांधले आहे त्या शौचालयाची आज अवस्था काय आहे? याकडे ते लक्ष देत नाहीत. मनसेच्या कामाचे श्रेय घेण्यातच यांना रस आहे, असे तुषार पाटील यांनी म्हटले आहे. मनसेचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी दिवा शहरात शिवसेनेकडून प्रत्येक कामाच्या उद्घाटनाचे
श्रेय घेण्याच्या प्रवृत्तीवर हल्लाबोल केला असून दिव्यातील पायाभूत सुविधांसाठी आमदार राजू पाटील हे प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी मात्र दिवा शिवसेनेचे नेते पुढे पुढे धावतात असा आरोप केला आहे. काम मनसे करणार आणि श्रेय शिवसेना घेणार हे चिरीमिरीचे
राजकारण बंद करा असे तुषार पाटील यांनी म्हटले आहे.
जाहिरात