मनसे विकास अन् हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकसभेच्या २५ जागा लढणार

Spread the love

छत्रपती संभाजीनगर :- आधीचे सरकार असो किंवा आताचे सरकार विचारधारा सोडून केवळ सत्तेसाठी एकत्र येतात, सत्तेतून पैसा कमवितात, यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नाही, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे आगामी लोकसभेत २० ते २५ जागा लढविणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघानिहाय मेळावे घेण्यासाठी दोन दिवसांपासून नांदगावकर छत्रपती संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत. शुक्रवारी सकाळी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना नांदगावकर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक अद्याप जाहिर झालेली नाही, पण पक्षाने ही निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आम्ही काल शहरातील पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेतल्यानंतर आज पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
पक्षाकडे उमेदवार कोठे या प्रश्नाचे उत्तर देताना नांदगावकर म्हणाले की, आमच्याकडे उच्चशिक्षित तरुण पदाधिकाऱ्यांची फळी आहे. यापैकी कोणीही आमचा उमेदवार होऊ शकतो. मनसेने विकासाच्या प्रश्नांवर शहरात अनेक आंदोलने केली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात जाहिर सभा घेतली. पक्षाने आंदोलन केले. एवढेच नव्हे तर गणेशोत्सवातही डि.जे. लावून नाचणाऱ्यांचाही त्यांनी विरोध केला आहे. आगामी जिल्ह्यात पक्षाचा एकही नगरसेवक नाही, असे असताना तुम्ही लोकसभा निवडणुक लढविण्याचे धाडस कोणाच्या जिवावर करता, असा प्रश्न उपस्थित केला असता मनसे नेते म्हणाले की, लोकसभा मतदार संघातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास आम्ही केला आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये समस्यांच समस्या आहेत. याकडे आताचे सत्ताधारी आणि आधीचे सत्ताधारी यांनी लक्ष दिले नाही. एवढेच नव्हे तर मनपा आयुक्तही विकास कामाच्या बाबतीत उदासिन दिसतात. यामुळे आजी,माजी सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवर चालणारा आहे. जे चूक आहे, ते आम्ही ठणकावून सांगणार मग समोर नरेंद्र मोदी असो किंवा अन्य काेणीही. सरकारनेही मराठासमाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page