मुंबई : कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वादंग निर्माण झाला आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी असलेला स्थानिकांचा विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडून काढत मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात आले. यावेळी पोलिसांनी सुमारे ११० आंदोलकांना ताब्यातही घेतले. दरम्यान, याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा शिंदे गटातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत असताना मनसेनेही याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले नितीन सरदेसाई?
“कोकणातील प्रकल्पांबाबत राज ठाकरे यांनी यापूर्वीही भूमिका स्पष्ट केली आहे. कोकणात रोजगाराच्या संधी खूपच कमी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोकणातील बरीचशी घरं आज रिकामी दिसतात. कारण येथील तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईत येतात. त्यामुळे कोकणात पर्यटन आणि येथे पिकणाऱ्या काजू आणि आंब्यासारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात आले पाहिजेत. यातून येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल”, अशी प्रतिक्रिया नितीन सरदेसाई यांनी दिली.
जाहिरात